सागरी महामार्ग खरंच कोकणच्याविकासाचा महामार्ग ठरेल?
-कोकण म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्न.. पुर्वेला सह्याद्रीच्या रांगा आणि पश्चिमेला अथांग सागर.. मधल्या चिंचोळ्या पट्टीत कोकण विसावला आहे.. कोकणावर निसर्गानं मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे.. कोकणात अनेक अशी ठिकाणं आहेत की, ती केरळ किंवा गोवयापेक्षाही सुंदर आहेत.. मात्र हे सौंदर्य जगासमोर आलेच नाही.. राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी त्यात कमी पडले.. मला तर नेहमी शंका अशी येते की, कोकणात पर्यटकांनी येऊच नये असा तेथील राजकीय नेत्याचा प्रयत्न आहे की काय..? कारण पर्यटन विकासासाठी जो पायाभूत साधनांचा विकास होणं अगत्याचं असतं तो आजही झाला नाही.. छोटं उदाहरण रस्त्याचं घ्या.. कोकणाच्या तीन जिल्हयातून जाणारा मुंबई – गोवा महामार्ग आहे.. 475 किलो मिटर च्या या रस्त्याच्या रूंदीकरणाचं काम 2012 ला सुरू झालं आजही ते अपूर्ण आहे.. कोकणची लाइफ लाइन म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग चौपदरी व्हावा यासाठी एकाही राजकीय पक्षानं कधी आवाज उठविला नाही.. या महामार्गावर रोज दीड या न्यायानं वर्षाला 450-500 निष्पाप लोकांचे बळी जायचे.. यातले काही पर्यटक असायचे काही स्थानिक.. पण सोयरसुतक कोणालाचं नव्हतं.. मग कोकणातील पत्रकारांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुद्दा हाती घेतला.. त्यासाठी सतत सहा वर्षे सनदशीर मार्गानं आंदोलनं केली.. मुंबई – दिल्ली गाठली.. तेव्हा कुठं महामार्गाचं काम मार्गी लागलं.. पण 9 वर्षे झाली पण 475 किलो मिटर चा हा रस्ता अजूनही पूर्ण झाला नाही.. म्हणजे वर्षाला 50 किलो मिटर चा रस्ताही होत नाही.. या रस्त्याच्या मागून काम सुरू झालेला पुणे – नाशिक किंवा पुणे औरंगाबाद हे रस्ते पूर्ण झाले.. कोकणातील रस्त्याच्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य कोण हे कधीच पुढे येणार नाही.. कोकणाच्या मध्यभागातून हा रस्ता जात असल्याने आणि घाटावरून येणारे अनेक रस्ते या मुख्य रस्तयाला मिळत असल्याने पर्यटन विकासासाठी हा रस्ता फारच महत्वाचा आहे.. दोन्ही बाजुला निसर्ग तर आहेच पण त्याचबरोबर धार्मिक आणि एेतिहासिक स्थळांची रेलचेल आहे.. त्यामुळे हा रस्ता लवकर मार्गी लागावा अशीच कोकणी जनतेची इच्छा आहे..गंमत अशी की, या रस्त्यावर आज ही कोणी बोलत नाही.. मात्र रेवस – रेडी या 540 किलो मिटर च्या रस्त्यासाठी अनेकांचा जीव कासावीस होताना दिसत आहे.. आम्ही मुंबई – गोवा महामार्गासाठी लढत होतो तेव्हाही आम्हाला सांगितलं जायचं, हे सोडा सागरी महामार्गासाठी लढा… रेवस – रेडी हा सागरी महामार्ग अनेकांना पर्यटन विकासाचा महामार्ग वाटतो.. सरकारलाही तसे वाटते. म्हणूनच कालच्या बजेटमध्ये या महामार्गासाठी 9 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे.. रेवस – मांडवा – अलिबाग-मुरूड-दिघी पोर्ट, बाणकोट, दापोली, गुहागर, जयगड, गणपती पुळे, रत्नागिरी, जैतापूर, देवगड, मालवण, वेंगुर्ला असा हा मार्ग आहे.. समुद्राच्या काठावरून जाणारया या महामार्गावरून प्रवास करताना वेगळाच आनंद मिळणार आहे हे नक्की.. पण घाटावरून जे रस्ते कोकणात येतात त्यांना सागरी महामार्ग दूरचा पडणार आहे..जवळचा असणार तो मुंबई गोवा महामार्गच.. मुंबईवरून थेट कोकणात किंवा गोव्याला जाणारयांसाठी हा सागरी महामार्ग जास्त उपयुक्त ठरणार आहे.. ते काहीही असो कोकणात जाणारे दोन समांतर रस्ते झाले तर नक्कीच कोकणचा चेहरा मोहराच बदलून जाईल यात शंकाच नाही.. कोणाबरोबर कोकणच्या पुढारयांचीही रस्त्यामुळे भरभराट होणार आहे.. कारण रस्त्याच्या कडेच्या सारया जमिनी पुढारयांनी अगोदरच घेतल्या आहेत. त्यामुळं या रस्त्याचं अधिक कौतूक असलं तरी हरकत नाही पण तो वेळेत पूर्ण व्हावा एवढीच अपेक्षा आहे.. कारण या मार्गावर 44 खाडी पूल आहेत, 21 मोठे पूल आहेत, 22 मोरया आहेत, त्यामुळे वेळ लागणार आहे.. जमिन संपादन हा देखील मोठा विषय आहे.. इकडे सरकारी जमिनी नाहीत.. खासगी जमिनी आणि त्याही पुढाऱ्याच्या असल्यानं ते किती दर घेतील सांगता येत नाही.. रस्ता दुपदरी व्हावा की चौपदरी हा देखील वाद विषय आहे.मोठी खर्चिक बाब आहे.. तरीही हा रस्ता वेळेत पूर्ण व्हावा असेच सारयांना वाटते..कोकणचा केमिकल झोन झालेला आहे.. यापुढे तरी कोकणाचं वैभव जपलं पाहिजे, पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करण्यासाठी जे जे शक्य आहे ते केले पाहिजे.. मुंबई आणि पुण्याच्या बाहेर कोकणची फार ओळख नाही.. मराठवाडा, विदर्भातील पर्यटक गोव्याला न जाता कोकणात आला पाहिजे असा विकास झाला पाहिजे. कोकणचे दुर्दैव असं तेथील राजकारण्यांना असे वाटतच नाही.. मी 18 वर्षे कोकणात होतो. त्यामुळं सारं राजकारण जवळून अनुभवलं आहे.. कोकणी राजकारण्यांची मानसिकता आता तरी बदलावी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येनं कोकणात यावं यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत एवढीच अपेक्षा.. पर्यटक आले तर कोकणी जनतेला रोजगार मिळेल.. त्यातून आर्थिक सुबत्ता येईल.. त्यासाठी कोकणात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले पाहिजे..