शेती करेन पण फोटोग्राफर्सची माफी मागणार नाही
मुंबई: बॉलिवूडचा दबंग सलमान खान कधी चांगल्या तर कधी वाईट कारणांमुळे तसा नेहमीच चर्चेत असतो. पण सध्याची ताजी कॉन्ट्रोव्हर्सी फोटोग्राफर्सने त्याच्यावर घातलेला बहिष्कार. सलमान खानचे फोटो क्लिक न करण्याचा निर्णय फोटोग्राफर्सनी घेतला आहे.मात्र तरीही सलमानचा दबंग अंदाज कायम आहे. ‘पनवेलमध्ये जाऊन शेती करेन पण फोटोग्राफर्सची माफी मागणार नाही’, असं सलमानने म्हटलं आहे.
11 जुलै रोजी ‘किक’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सलमान खानचा बॉडीगार्ड आणि फोटोग्राफर्स यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर सलमानने माफी मागावी अऩ्यथा त्याच्यावर बहिष्कार घालू अशी भूमिका फोटोग्राफर्सनी घेतली आहे.
परंतु फोटोग्राफर्सच्या बहिष्कारामुळे सलमानला काहीही फरक पडत नसल्याचं दिसत आहे. याआधी ट्वीट करुन त्याने दाखवूनही दिलं आहे. ‘ही त्यांची भूमिका आहे. त्यांचं काम सुटेल. पण तरीही फोटोग्राफर्सनी माझे फोटो क्लिक न करण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांच्यासाठी फारच खुश आहे,’ असं सलमाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
his is wat I call a stand, the photographers r gonna loose out on wrk, but hv still taken a decision not to take my pics, happy fr them .
जर फोटोग्राफर्स आपल्या भूमिकेवर ठाम असतील तर माझ्या मनात त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढेल, असंही सलमानने म्हटलं आहे.
I wld hv immense respect for them if they keep this stand .
किक सिनेमातील डेव्हिल या विशेष गाण्याच्या प्रमोशन इव्हेंटदरम्यान सलमानच्या बॉडीगार्डची काही फोटोग्राफर्ससोबत बाचाबाची झाली. या फोटोग्राफर्सनी सलमान खानच्या पोझसाठी थोड्या जागेची मागणी केली होती आणि याचदरम्यान त्याच्यात हाणामारी झाली. यानंतर हे प्रकरण सोडवण्याऐवजी सलमान म्हणाला की, ज्यांना माझा हा इव्हेंट कव्हर करायचा आहे त्यांचं स्वागत आहे, बाकीचे जाऊ शकतात. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्समध्ये नाराजी वाढणार हे निश्चित होतं. याआधीही सलमानने असा उद्धटपणा केला होता. सलमान खान ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यावेळी एका फॅनने त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता त्याचा पारा वाढला. सलमानने तिच्या हातातून फोन खेचला आणि फेकून दिला ( एबीपी माझा वरून साभार .)