बीड जिल्हयातील 70 टक्के जनतेनं अजून रेल्वेतून प्रवास केलेलाच नाही तर जवळपास पन्नास टक्के जनतेनं अजून रेल्वे पाहिली देखील नाही हे बीडच्या बाहेरच्या जनतेला खरंही वाटणार नाही.मात्र ती वस्तुस्थिती आहे. याचं कारण बीड जिल्हयात रेल्वच नाही.परळी-परभणीला जोडणारा एक वीस किलो मिटरचा रेल्वे फाटा सोडला तर आख्या बीड जिल्हयात कोठेही रेल्वे रूळ नाही..परळी-बीड-नगर मार्गासाठी आम्ही गेली पन्नास वर्षे बोंबलतो आहोत.त्यासाठी रेल्वे बजेटकडं मोठ्या आसुसलेल्या नजरेनं बीडकर जनता बघत असते. मात्र दरवर्षी रेल्वे बजेटमध्ये बीड जिल्हयातील जनतेच्या तोंडाला पानं पुसली जातात.ही परंपरा यंदाही कायम आहे.आज सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गासाठी दमडीही दिल्याचे दिसत नाही.बदल करा नाही तर काय करायचं ते करा,वाट्याला काहीच येत नाही ही बीडची शोकांतिका आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे होऊन गेली.तरीही देशातील एका जिल्हयातल्या पन्नास टक्के जनतेनं रेल्वे पाहिलीच नसेल तर याची जरा तरी शरम राज्यकर्त्यांवना वाटलीच पाहिजे.बुलेट ट्रेन सुरू कऱणार,रेल्वे स्थानकं विमानतळासारखी चकाचक करणार वगैरे घोषणा बाडकर जनतेच्या जखमांवर मीठ रगडणा़ऱ्या आहेत हे नक्की.याचा अर्थ याला विरोध आहे असं नाही पण बीडला किमान सिंगल टॅक तरी टाका एवढीही अपेक्षा बीडच्या जनतेनं करायची नाही काय.? संताप आणणारं आहे हे सारं. आज गोपीनाथरावांची आठवण तीव्रतेनं येते ते असते तर त्यांनी असं होऊ दिलं नसतं…
अर्थात आता रस्त्यावर आल्याशिवाय मार्ग नाही असं वाटतंय.हे रस्त्यावर येणं केवळ रेल्वे बजेट सादर होण़ाऱ्या दिवसापुरतं नसावं.त्यात वर्षभर सातत्या असावं.तरच किमान पुढच्या बजेटमध्येही तरी काही वाट्याला येईल.जिल्हयातील राजकीय पक्षांना त्यासाठी वेळ असण्याचं कारण नाही.त्यांच्यावर कोणाचा विश्वासही नाही.तेव्हा जिल्हयातील पत्रकारांनी हा विषय हाती घेऊन आणि त्यासाठी सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांची मदत घेऊन हा विषय मार्गी लावावा असं मला वाटतं.कोकणातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी रस्ते रोखले,आणि सरकारला वठणीवर आणले.त्यासाठी दिल्लीपर्यत पाठपुरावा केला.अखेर त्या रस्त्याचं काम आता सुरू झालं आहे.पहिला 84 किलो मिटरचा टप्पा होत आलाय.दुसऱ्या टप्पयाला नितीन गडकरी यांनी हिरवा कंदिल दाखविलाय.या आंदोलनात माझाही खारीचा वाटा होता. बीडच्या पत्रकारांनी हे करणं गरजेचं आहे असं वाटतं.सर्वांनी एकत्र येत या अंगानं विचार केला पाहिजे अशी माझी विनंती आहे.
परळी-बीड-नगर हा रेल्वे मार्ग झाला तर परळी,वडवणी,बीड,आष्टी,पाटोदा हे तालुके रेल्वे टॅॅकवर येतील आणि या साऱ्या मागास भागाच्या विकासाला चालना मिळेल.पण हे सारं आपोआप होईल किंवा कोणीतरी मसिहा अवतरेल आणि हा प्रश्न सोडवेल ही समजूत आपणास सोडून द्यावी लागेल.रस्त्यावर आल्याशिवाय आता मार्ग नाही. भाडल्याशिवाय,रस्त्यावर आल्याशिवाय मराठवाड्याला काही मिळत नाही हा अनुभव आहे.मराठवाडा विकास आंदोलन त्यातूनच उभं राहिलं होतं.एवढंच कशाला औरंगाबाद -नांदेड बॅॉडगेज होण्यासाठी सतत अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. या आंदोलनात बीडच्या जनतेचाही मोठा सहभाग होता..मात्र दुःख याचं होतंय की,तो विषय संपल्यावर आता बीडसाठी अन्य जिल्हयातील कोणी बोलत नाही.त्यासाठी बीड जिल्हयातील जनतेलाच आता बोलावे लागेल,भांडावे लागेल,रस्त्यावर यावे लागेल नाही तर केवळ प्रतिक्षेत आणखी किती पिढ्या रेल्वे न बघताच जातील ते सांगता येणार नाही.
एस.एम.देशमुख