रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे आज शिवसेनेत जात आहेत.यापुर्वी बरेच दिवस त्यांचा मुक्काम राष्ट्रवादीत होता.सुनील तटकरे हे रोह्याचे.त्यामुळं रोह्यातल्या कोणत्या कार्यकर्त्याला किती वाढू द्यायचं याचं त्याचं नियोजन ठरलेलं असतं.नाईलाज म्हणून एक वर्षासाठी त्यांनी समीर शेडगेंना नगराध्यक्ष केलं तरी सुनील तटकरे अस्वस्थ होते.कारण या एक वर्षाच्या नगराध्यक्षपदाच्या काळात त्यांनी रोहा नगरपालिकेचं कल्चरच बदलून टाकलं.कार्यालयात स्वतःचा डबा घेऊन येणारा पहिलाच नगराध्यक्ष रोहेकर पहात होते.सतत लोकांमध्ये जावून त्यांनी रोह्यातील प्रश्नांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला.रोहेकरांच्या समस्यांसाठी त्यांनी व्हॉटसअॅप ग्रुप तयार करून प्रश्न समजून घेतले आणि लगेच सोडविले.मृदू स्वभाव,भ्रष्टाचारमुक्त व्यवहार आणि प्रत्येकाला आपला वाटणारा माणूस यामुळे नगराध्यक्षपदाच्या काळात त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की,भविष्यात समीर शेडगे आपल्याला डोकेदुखी होऊ शकते याची जाणीव नेते तटकरे यांना झाली.अशा स्थितीत समीर शेडगेंचे पंख छाटणे आवश्यक होते.अर्थात पंख छाटण्याचं ‘महान कार्य’ सुनील तटकरे यांनी केवळ समीर शेडगे यांच्या बाबतीतच केलं असं नाही तर रोहयातील अनेक उमदया कार्यकर्त्याचं राजकीय करिअर त्यांनी अशाच पध्दतीनं बाद करून टाकलं.आता वेळ आली होती समीर शेडगे यांची.नगराध्यक्षपदाचं तिकीट देतो देतो करीत त्यांना अंधारात ठेवलं आणि ऐनवेळी आपल्याच नातेवाईकाच्या गळ्यात रोह्याचं नगराध्यक्षपद लटकविलं.त्यामुळं अपक्ष म्हणून लढण्याशिवाय समीर शेडगेंकडं पर्याय नव्हता.तो त्यानी निवडला आणि जिद्दीनं एका मोठ्या शक्तीला टक्कर दिली.अवघ्या सहा मतांनी पराभव झाला.पण तटकरेंना त्यानी घाम फोडला हे नक्की.खरं तर शिवसेनेनं त्याचं वेळेस समीर शेडगेंना बोलून त्यांना उमेदवारी दिली असती तर आज रोहयाची नगरपालिका सेनेच्याा हाती दिसली असती.तसं झालं नाही.शिवसेना नेते तेव्हा ज्युनिअर तटकरेंच्या प्रेमात होते.तटकरेंच्या घरात आपण फूट पाडली याच्या आनंदात त्यानी समीर शेडगेंशी संपर्कच साधला नाही.त्यावेळेस मी स्पष्ट बजावलं होतं की,ही तटकरे कुटुंबाची राजकीय खेळी आहे.या सापळ्यात सेनेने अडकू नये.मात्र तसं झालं नाही.सेना तोंडावर आपटली.अपक्ष समीर शेडगे केवळ सहा मतांनी पराभूत झाले.समीर यांच्यासाठीं आता राष्ट्रवादी हा विषय संपला होता.अपक्ष म्हणून काम करणंही शक्य नव्हतं.त्यासाठी कोणतातरी राजकीय पर्याय निवडणं भाग होतं.दोन पर्याय होते.एक सेना .दुसरा भाजप.यातला पहिला पर्याय समीर शेडगेंनी निवडला आहे आणि तो रास्त आहे असं माझं मत आहे.याचं कारण असं की,दिल्लीत आणि मुंबईत भाजप मोठा भाऊ असला आणि सार्यांचा ओढा भाजपकडं असला तरी रोह्यात भाजपला फार स्थान नाही.रोहयात कश्याला रायगडातच भाजपला कोणी विचारत नाही.पनवेलमध्ये जे कमळ दिसते ते रामशेठ ठाकूर यानी लावलेले कमळ आहे.रामशेठ आणि प्रशांत ठाकूर यांची अवस्था अशी आहे की,त्यांना पनवेलचीच जहागिरी सांभाळायची आहे.पनवेलच्या बाहेर विस्तारण्याचा विचार त्यांनी कधी केला नाही आणि ते करणारही नाहीत.कारण त्यांचे उद्देश पनवेलशीच निगडीत आहेत.त्यामुळं उर्वरित रायगडमध्ये भाजप बेवारस आहे.नेता नाही,आणि मतदारही भाजपबरोबर नाही.भाजपमध्ये जावून सध्या तरी समीर शेडगेंना काही राजकीय भविष्य नव्हते.याउलट सेनेची स्थिती आहे.दक्षिण रायगड हा आजही सेनेचा बालेकिल्ला आहे.नेते कसेही असले तरी सेनेकडे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे.ते निष्ठावाण आहेत.नेता किंवा उमेदवार न बघता ते धनुष्यबाणाचंच बटन दाबतात.शिवाय समीर शेडगे सारखा प्रामाणिक नेता त्यांना मिळाला तर रोह्यात सेना वाढू शकते.कारण रोह्याची जनता तिथल्या घराणेशाहीला विटली आहे.संधी साधू राजकारणाचाही रोहेकरांना उबग आलेला आहे.अशा स्थितीत शिवसेनेने समीर शेडगेला जपले,थोडे स्वातंत्र्य दिले,थोडं प्रोत्साहन दिलं तर येत्या काही दिवसात रोहयाचं चित्र बदललेंलं दिसेल यात शंका नाही.रायगड शिवसेनेत मोठी गटबाजी आहे.पक्षापेक्षा स्वतःचा विचार करणारे काही नेते आहेत.परस्परांच्या तंगडया ओढताना विरोधकांशी हातमिळविणे केली गेल्याचेही प्रकार इतिहासात अनेकदा घडले आहेत.अर्थात हे सर्वत्र दिसते.नेत्यांचे भले काहीही चालले असले तरी कार्यकर्ते पक्षाबरोबर असतात.समीर शेडगेंसाठी ही मोठी जमेची बाजू आहे.त्यामुळं नक्कीच शेडगे याचं राजकीय भवितव्या उज्जवल आहे.समीर शेडगे हे पक्षातील कोणाशी स्पर्धा करण्यासाठी सेनेत गेले नाहीत.त्यांना रोहयात बदल घडवून आणायचा आहे.शिवसेना नेत्यांनी ही गोष्ट लक्षात ठेऊन त्यांना मदत केली पाहिजे असं मला वाटतं.रायगडातील शिवसेना अधिक भक्कम करण्यासाठी पक्षाला समीर शेडगे यांचा नक्कीच उपयोग होईल.अपक्ष असताना सहा मतानी पराभव झाला याचा अर्थ संपूर्ण रोहा त्यांच्याबरोबर आहे.रोहा सेनेने जिंकणे याला मोठा आणि वेगळा अर्थ आहे.समीर शेडगे यांना पक्षात घेऊन पक्षानं रोहयावर भगवा फडकविण्याच्या दिशेनं एक पाऊल पुुढं टाकलंय यात शंकाच नाही.समीर शेडगेंच्या पुढील राजकीय वाटचालीस मनापासून शुभेच्छाः
एस.एम.देशमुख —