पुणे – ‘लोकशाहीच्या मूल्यांवर अनेक बाजूंनी आघात होत आहेत. मात्र समाज मृतप्राय झाला आहे. त्यामुळे भूमिका घेऊन त्याला जागे करण्यासाठी पत्रकारांनी क्रियाशील व्हावे,‘‘ असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी गुरुवारी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वागळे बोलत होते. या वेळी संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे, कार्यवाह श्याम दौंडकर उपस्थित होते.
वागळे यांनी माध्यमांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेऊन त्या समोरील आव्हानांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राची पत्रकारिता सध्या एका वेगळ्या वळणावर असून, माध्यमांचा चेहरा, रूप, भाषा आणि शैली बदलली आहे. मात्र, तत्त्वे बदलली का, हा महत्त्वाचा भाग आहे. सत्य, प्रामाणिकपणा आणि जनतेशी बांधिलकी ही तत्त्वे कालातीत आहेत.‘‘
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब राहिला आहे का, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, ‘या खांबाला अन्य तीन खांबासारखी कीड लागली आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. सध्या भ्रष्टाचार हा अधिकार झाला आहे. त्याविरुद्ध भूमिका घेण्यास माध्यमांत मर्यादा येत असल्या तरी “सोशल मीडिया‘चा वापर करून, त्यावर सत्य मांडण्याची गरज आहे. ते आपले मिशन असावे. तसेच लोकशाहीसमोर अनेक आव्हाने उभी असताना पत्रकारांनी भूमिका घेऊन क्रियाशील झाले पाहिजे.‘‘
या वेळी वागळे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. पांडुरंग सरोदे, मीनाक्षी गुरव आणि रोहित आठवले यांनी सूत्रसंचालन केले.