मुख्यमंत्र्यांनी परवा एक मुद्दा मांडला होता,पत्रकार संरक्षण कायदा केला तर त्याचा गैरफायदा काही लोक घेतील.फडणवीस जे म्हणाले ते खरंय,काहीजण कायद्याचा गैरफायदा नक्की घेतील पण कालांतरानं त्यांचा सन्मान,त्यांचा सत्कार कोणी कऱणार नाही किंवा आपलेपणानं त्याच गुणगाणही कोणी कऱणार नाही.सत्कार,सन्मान हा चांगुलपणाचाच होतो.समाज नतमस्तकही कर्तृत्वासमोरच होतो . हे सरकार का लक्षात घेत नाही?.आज पुण्यात अशाच तपस्वी,समाजासाठी आयुष्य झोकून देणार्या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार, सन्मान केला गेला.मराठी भाषा सवंर्धन संस्थेला आम्ही धन्यवाद देतो.त्यांनी चौफेर कर्तृत्व गाजवून आज विस्मृतीत गेलेल्या मान्यवर पत्रकाराना बोलावून त्यांना सन्मानित केलं.ज्यांचा सन्मान केला त्यात 94 वर्षांचे रामभाऊ जोशी होते,80 वर्षाचे एस.के.कुलकर्णी होते,विध्याताई बाळ होत्या,हेमंत जोगदेव,अशोक शिधये,डेव्हिड,कमलाकर पाठकजी,चंद्रकांत दीक्षित,रंगनाथ मालवी एकनाथ बागुल,ल.गो.शिवापुरकर ,अशोक डुंबरे आणि असेच अनेक जण होते.आजच्या पिढीला ही सारी नावं नक्कीच अपरिचित असतील पण या सर्वांनी आपल्या चौफेर,सकारात्मक,आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा अमिट ठसा पुण्याच्या पत्रकारितेवर उमटविलेला आहे.आज पत्रकारितेतील अपप्रवृत्तीबद्दल अनेकजण गळे काढतात.अशा प्रवृत्ती तेव्हाही होत्या.पण बोलबाला सत्तप्रवृत्तीचा होता . तो ही त्यांच्या कर्तृत्वामुळं.या सर्वांनी पत्रकारिता उपजिविकेचं साधन म्हणन कधी केली नाही.एक मिशन म्हणूनच त्यांनी पत्रकारिता करून पुण्याच्या वैभवात आपआपल्या परिनं भर घालण्याचा प्रयत्न केला आहे.एक काळ असा होता की,मराठी पत्रकारितेचं केंद्र पुणेच होतं.तो वारसा जपण्याचा प्रयत्न रामभाऊ जोशी किंवा एस.के.कुलकर्णीसरांच्या पिढीनं केला होता.या पिढीनं उगवत्या पिढीला केवळ सल्लेच दिले नाहीत,किंवा त्यांच्या दोषांवरच बोटं ठवले नाही तर नव्या दमाचे,चांगले पत्रकार घडविण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.एस.के.कुलकर्णी तर पत्रकारितेचं चालतं -बोलतं विद्यापीठच होतं.एस.के.सरांच्या तालमीत अनेक पत्रकार तयार झाले.आपण एस.के.सरांचे शिष्य आहोत हे देखील अनेकजण अभिमानानं सागत असतात.अशा ऋुषीतुल्य पत्रकारांचा सन्मान करून मराठी भाषा संस्थेनं खरोखरच चांगला उपक्रम राबविला आहे.असे तत्वनिष्ठ पत्रकार महाराष्ठाच्या गामीण भागातही आहेत.प्रत्येक जिल्हयात आहेत.त्यांचा किमान जिल्हयाच्या पातळीवर सत्कार व्हायला हवा.तसा प्रयत्न आम्ही करणार आहोत.मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हयात 6 जानेवारी रोजी हे सत्कार होतील असा आमचा प्रयत्न असणार आहे.अशा सत्कारामागं दोन भावना असतात.एक तर त्यांच्या ऋुणातून उतराई होण्याचा एक अल्पसा प्रयत्न असतो आणि दुसरं म्हणजे अशा थोर व्यक्तीमत्वापासून नव्या पिढीला प्ररणा मिळावी हा देखील एक उद्देश असतो.आजच्या पत्रकारितेबद्दल ज्यांना बोटं मोडायचेत त्यांना मोडू द्या,पण सत्कार,सन्मान हे गुणांचेच होतात,चुकीच्या मार्गानं चालणाऱांचे नाही.ज्या थोरांचा आज पुण्यात सत्कार झाला त्याचं मनापासून अभिनंदन आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.