महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा आणि वयोवृध्द पत्रकारांना पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या आंदोलनास राज्यभर वाढता पाठिंबा मिळत आहे.विविध पत्रकार संघटना समितीच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा पुढे नेऊ इच्छितो अशी भूमिका घेत समितीच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्र संपादक परिषदेचे सचिव श्री.एकनाथ बिरवटकर यांनी आज पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांना एक पत्र पाठवून आमच्या संघटनेस पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीमध्ये सहभागी करून घेण्याची विनंती केली असून ती समितीने मान्य केली आहे.त्यामुळे यापुढे संपादक परिषद देखील समितीचा एक घटक असणार आहे.बिरवटकर यांनी एस.एम.देशमुख यांना पाठविलेल्या पत्रात समितीचे काम कौतूकास्पद असून आपले बळ वाढावे यासाठी आपल्या संघर्षात आम्ही भक्कमपणे आपल्या पाठिशी उभे राहू इच्छितो असे म्हटले आहे.संपादक परिषदेच्यावतीने संघटनेेचे उपाध्यक्ष प्रकाश कुलथे प्रतिनिधीत्व कऱणार आहेत.संपादक परिषदेने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल एस.एम.देशमुख यांनी कुलथे ,बिरवटकर यांना धन्यवाद दिले आहेत.पत्रकारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर किमान समान प्रश्नावर सर्वानी एकत्र आले पाहिजे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.-