श्रीवर्धन-म्हसळा तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार – तटकरे

0
1123

रायगड : श्रीवर्धन-म्हसळा तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांनी रायगड पाटबंधारे विभाग कोलाड विभागतर्फे कुडकी लघुपाटबंधारे योजनेच्या नविन विमोचकाचे बांधकाम व भूमिपूजन समारंभ प्रसंगी केले. या प्रसंगी श्रीवर्धन तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष महंमद मेमन, पंचायत समिती सभापती स्वाती पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्याम भोकरे, श्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे, सरपंच जगदास चौलकर, अधिक्षक अभियंता वाडगावे, कार्यकारी अभियंता चव्हाण आदी उपस्थित होते. श्री. तटकरे म्हणाले की, कुडकी धरणास मोठी गळती लागली होती. येथील ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करुन ती थांबविली. यामध्ये धरणाच्या मुख्य विमोचक विहिरींचे नुकसान झाल्याने या धरणावर अवलंबून असलेली कुडकी, वडवली, शिस्ते, गोंडघर, भावे गावातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून नियोजनबध्द पध्दतीने पाणी पुरवठा करण्यात आला. या धरणाच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार व मर्यादित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी आमदार निधीतून वडवली येथे बांधण्यात आलेल्या भंडारी समाज सभागृहाचे उद्घाटनही श्री. तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here