श्रीमंत मजुराची दांडगाई
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मजूर आहेत का? उत्तर अर्थातच नाही असे आहे.. किमान त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून तरी तसे दिसत नाही.. उलट कोटयवधींच्या संपत्तीचे ते धनी दिसतात.. मुंबई जिल्हा बँकेवर निवडून येताना मात्र ते मजूर या वर्गवारीतून अर्ज भरतात.. निवडूनही येतात.. मागील पाच वर्षे मजूर संस्था वर्गवारीतून ते बँकेवर निवडून आले होते.. यावेळेस देखील बँकेवर येण्याचा त्यांनी हाच मार्ग निवडला.. या बाबतच्या काही तक्रारी सहकार सचिवांकडे केल्या गेल्या.. त्याच्या बातम्या संदीप आचार्य आणि निशांत सरवणकर यांनी लोकसत्तात दिल्या.. त्यातील एका बातमीचे शिर्षक होते, प्रवीण दरेकर :बँकेचे श्रीमंत मजूर… या बातमीमुळे दरेकरांचे बिंग फुटले होते.. स्वाभाविकपणे ते संतापले, चिडले.. माणूस एकदा संतापला की, मग तो सारासार विवेक विसरतो.. दरेकर यांचे असेच झाले.. “लोकसत्तानं आपली आणि बँकेची नाहक बदनामी केली” असा गळा काढत दरेकर यांनी मग थेट माता रमाबाई पोलीस ठाणे गाठले.. संदीप आचार्य आणि निशांत सरवणकर यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करीत त्यांनी पोलिसांसमोर धरणे आंदोलन सुरू केले.. .. खरं तर एखादी बातमी बदनामी करणारी आहे असे वाटत असेल तर त्या विरोधात न्यायालयात रितसर दाद मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. प्रवीण दरेकर यांनाही तो आहे.. मात्र त्यांना हा मार्ग अंगलट येणारा वाटल्याने त्यांनी पोलिसांवर दबाव आणून पत्रकारांच्या मुसक्या आवळणयाचा प्रयत्न करून पाहिला.. त्यासाठी तब्बल चार तास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.. दरेकर यांच्या तक्रारीत काही दम नसल्याने पोलिसांनी पत्रकारांवर गुन्हा दाखल केला नाही.. दरेकर यांचा जबाब नोंदवून घेतला.. तरीही दरेकर पोलीस ठाणे सोडत नव्हते.. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान उपटल्यानंतर ते उठले..पोलिसांवर दबाव आणून पत्रकाराचा आवाज बंद करण्याचा दरेकर यांचा प्रयत्न निषेधार्ह आहे.. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषद या प्रकाराचा निषेध करीत आहे..
पुरोगामी महाराष्ट्रात कधी पत्रकारांवर थेट शारीरिक हल्ले करून, कधी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून तर कधी पत्रकारांच्या नोकरयांवर गदा आणून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो मात्र पत्रकार अशा कोणत्याही प्रकारांना भीक घालत नाहीत… घालणार नाहीत.. माध्यमांवर मोठ्या रक्कमेचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करून माध्यमांची नाकेबंदी करण्याचा देखील प्रयत्न काही धनदांडगे करीत असतात.. प्रवीण दरेकर यांनी देखील लोकसत्ताच्या विरोधात हजार कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे.. आम्हाला मनमानी पध्दतीने वागू द्या, त्याआड आलात तर विविध मार्गांनी तुमचा आवाज बंद करू असा असा दम दिला जात आहे.. असं होत राहिलं तर पत्रकारांना काम करणं अवघड जाईल.. म्हणूनच लोकशाहीवादी लोकांनी तरी माध्यमांची पाठराखण केली पाहिजे..
प्रवीण दरेकर प्रकरणात पत्रकारांनी आपली भूमिका समर्थपणे पार पाडली आहे.. संदीप आचार्य आणि निशांत सरवणकर त्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत.. आता सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत योग्य ती कारवाई केली पाहिजे
एस.एम.देशमुख
किरण नाईक