आपले मत विचारात न घेता रायगड राष्ट्रवादीला दिल्याने नाराज झालेले काँग्रेस नेते बॅ.ए.आर. अंतुले यांनी शेकापक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची मनधरणी करुन शिष्टाई केली. त्यामुळे अंतुले यांनी रायगड आणि मावळमध्ये राष्ट्रवादीच्याच उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी दिली.
नारायण राणे यांचे सर्मथक माजी आमदार श्याम सावंत आणि माणिकराव जगताप निवडणुकीकरिता इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. हाच फायदा उठवत शरद पवार यांनी रायगड आपल्या पदरात पाडून घेत या ठिकाणी सुनील तटकरे यांना निवडणुक रिंगणात उतरवले. काँग्रेसला युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांच्याकरिता हिंगोली मतदार संघ हवा होता. सातव यांच्याकरिता रायगड हा पारंपारिक मतदार संघावर काँग्रेसला पाणी सोडावे लागले.
या मतदारसंघाची बांधणी करणारे आणि या भागात काँग्रेस वाढवणार्या अंतुले यांना विचारात घेण्यात आले नसल्याचे त्यांनीच सांगितले. त्यातच तटकरे यांच्याबद्दल गुरुच्या मनात राग आहेच. त्याचा फायदा घेत शेकापक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांनी अंतुले यांची भेट घेऊन शेकापक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची विनंती केली. ही विनंती त्यांनी मान्य करित दोनदा उमेदवारांच्या पाठीवर हात ठेवला, इतकेच नाही तर बाळा नांदगावकरही त्यांच्या भेटीला गेले. नाराज अंतुलेंनी सुनील तटकरे यांच्यावर तोफ डागली.
त्यामुळे काँग्रेस आणि त्यातल्या त्यात सुनील तटकरे यांच्यावर कुरघोडी केल्याचा आनंद आमदार जयंत पाटील यांना झाला खरा पण तो जास्त दिवस टिकला नाही. सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट अंतुले यांचे घर गाठले. सुमारे दीड तास चाललेल्या चर्चेत चव्हाण यांनी अंतुले यांची समजुत काढून मावळ आणि रायगड लोकसभा मतदार संघातील अँड. राहुल नार्वेकर आणि सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्याची विनंती केली.