बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माझे मित्र सुभाष चौरे यांची बीड येथून गेली पन्नास वर्षे प्रसिध्द होत असलेल्या ‘चंपावतीपत्र’ या दैनिकाच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती झाली आहे.ग्रामीण भागातून आलेया आणि पत्रकारितेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सुभाष चौरे यांनी प्रामाणिकपणे पत्रकारिता करीत बीड जिल्हयातील पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा आणि दबदबा निर्माण केला आहे.सामाजिक बांधिलकी जपणारा,शेतकर्यांच्या प्रश्नांवर कठोरपणे लेखणी चालविणारा, कोणाचीही भिडमुर्वत न ठेवता जनतेच्या बाजुनं लढणारा पत्रकार म्हणून सुभाष चौरे यांना बीड जिल्हा ओळखतो.जिल्हयातील रेल्वेचा प्रश्न असो की,रस्तांचे प्रश्न असोत नाही तर पाणी टंचाईनं त्रस्त झालेल्या जनतेचे प्रश्न असोत सुभाष चौरे यांनी लेखणीच्या माध्यमातून या प्रश्नांच्या विरोधात सातत्यानं आवाज उठविला.अनेकांना न्याय मिळवून दिला .अन्यायाच्या विरोधात उभे राहणारे चौरे स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात देखील तेवढयाच प्रखरपणे समोर असलेल्या बलाढय शक्तीच्या विरोधात उभे राहिले.हल्ली पत्रकार जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात,नोकर्या टिकविण्यासाठी ते अनेक तडजोडी स्वीकारतात..सुभाष चौरेंना हे जमले नाही हे मी पाहिलं आहे.म्हणून मला त्याचं विशेष अप्रुप वाटत आलेलं आहे.
माध्यमात असून देखील प्रसिध्दीपासून चार हात दूर राहणारे,मितभाषी,संयमी,शांतपणे आपलं निवेदन करणारे पण वेळ येईल तेव्हा तेवढेच कणखर होणारे सुभाष चौरे चांगले संघटक आहेत.बीड जिल्हयात मोडून पडलेली पत्रकार संघटना सुभाष चौरे यांनी काही सहकार्यांना बरोबर घेऊन नव्यानं बांधली.आज बीड जिल्हयात एक भक्कम पत्रकार संघटना ‘बीड जिल्हा मराठी पत्रकार संघा’च्या रूपानं उभी आहे.संघटना बांधून उत्सही कार्यक्रम राबविणे एवढाचा सुभाष यांचा उद्देश नाही तर गरजू पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून मदत करण्याचा एक आदर्शही सुभाष चौरे यांनी राज्याला घालून दिलाय.भास्कर चोपडे यांच्या आजाराच्या वेळेस आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी आपलेपणानं जी मदत केली ते सारं कौतूकास्पद आणि तरूण पत्रकारांना दिलासा देणारं होतं.
ग्रामीण पत्रकारांची अवस्था आज बरी नाही.कोणी आजारी पडलं तर त्याच्याकडं उपचारासाठी देखील पैसे नसतात ही अडचण लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्या सूचनेनुसार त्यांनी जिल्हयात पत्रकार कल्याण निधी उभारण्यास सुरूवात केली आहे.दुसर्यांची दुःख पाहून अस्वस्थ होणारी व्यक्तीच हे सारं करू शकते.जिल्हयातील पत्रकाराच्या मालकीचं पत्रकार भवन काही हितसंबंधधियांनी बळकावलं आहे त्याविरोधात देखील अगदी निर्धाऱानं सुभाष चौरे उभे राहिले आहेत..हा लढा देखील तेवढाच मोठा आणि महत्वाचा आहे.
एक सजग,अभ्यासू आणि बीड जिल्हयाचं राजकारण,समाजकारण,अर्थकारण याची खडानंखडा माहिती असलेला एक पत्रकार चंपावतीपत्रचा कार्यकारी संपादक झाला ही गोष्ट नक्कीच जिल्हयातील पत्रकारांना आनंद देणारी आहे.सुभाष चौरे यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्चा..सुभाष चौरे यांची लेखणी जनसामांन्यांच्या कल्याणासाठी सदैव तळपत राहो हीच अपेक्षा