शिवाजी गेला
एक दिवस परभणीहून पत्रकार मित्र धनाजी जाधव यांचा फोन आला.. “परभणीचे पत्रकार शिवाजी क्षीरसागर मुंबईत टाटा समोर चार दिवसांपासून आहेत.. त्यांना अॅडमिट करून घेतले जात नाही.. कोणी विचारत नाही.. बघा काही करता आले तर.. त्याला ब्लड कॅन्सर आहे” असं धनाजी यांनी सांगितलं.. मी अस्वस्थ झालो.. दुसरया दिवशी मी मुद्दाम मुंबईला गेलो.. किरण नाईक आणि मी टाटा गाठले.. शिवाजीची भेट घेतली.. आम्ही त्याला मदत करायला आलोत हे जेव्हा त्याला कळले तेव्हा तो किरण नाईक यांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागला.. आम्ही कसे तरी त्याचे सांत्वन केले.. मंत्रालय गाठले.. ओमप्रकाश शेटे आणि मंगेश चिवटे यांची भेट घेतली..ओमप्रकाश शेटे यांनी टाटात फोन करून शिवाजीच्या Admission ची व्यवस्था केली.. तातडीने 1लाख 75हजार रूपये मंजूर केले.. मंगेशने तीन महिन्यासाठी निवास व्यवस्था केली.. दोन दिवसात शिवाजीची व्यवस्था झाली.. आमच्या आणि स्थानिक खासदाराच्या प्रयत्नातून केंद़कडून देखील मदत मिळाली.. शिवाजी ठणठणीत झाला.. मध्यंतरी त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याला फोन केला.. तेव्हा तो म्हणाला, ‘हा वाढदिवस तुमच्यामुळे बघायला मिळाला सर’ ..नंतर ही फेसबुकवर तो भेटायचा.. बरं वाटायचं..
हे सारं आठवण्याचं कारण की, आज सकाळी शेतात मॉर्निंग वॉकला गेलेलो असतानाच पुन्हा धनाजीचा फोन आला.. शिवाजी गेल्याची अत्यंत दु:खद बातमी त्यांनी दिली.. अस्वस्थ झालो.. खरं तर शिवाजीचा आणि माझा पुर्वीचा परिचय नव्हता.. मात्र त्याच्यावरील उपचाराच्या निमित्तानं एक आपलेपणा, जवळीक निर्माण झाली होती.. परभणीचा कोणाचा फोन आला तरी काय म्हणतोय, शिवाजी? असा माझा प़श्न असायचा..
शिवाजीला एक दिवस चक्कर आली.. दुखणं स्थानिक डॉक्टरांच्या लक्षात आलं.. त्यांनी पुढील तपासण्यासाठी मुंबईला पाठवलं.. आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई बघणारया शिवाजीला मुंबईचा अनुभव फार चांगला आला नाही.. निदान झालं आणि तो ज्यांच्यासाठी काम करीत होता त्यांनी वारयावर सोडलं.. हे नेहमीच घडतं.. संघटनेची गरज आणि महत्व अशावेळी लक्षात येते.. असो. शिवाजीचा मृत्यू मला वेदना देणारा ठरला.. जेवढे शक्य होते तेवढी शक्य होती तेवढी मदत करूनही शिवाजीला वाचविता आलं नाही.. याचं दु:ख आणि खंत आहेच..
शिवाजीला भावपूर्ण श्रद्धांजली