विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे हा सार्वजनिक चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झालेला असतानाच अलिबाग तालुक्यातील वळके येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक राजेंद्र नाईक यांनी आपल्या पुरता हा विषय सोडविला असून शुन्य दफ्तर वर्ग ही अभिनव संकल्पना त्यांनी अमलात आणली आहे.त्याचे कौतुक होत आहे.
शुन्य दफ्तर योजनेनुसार सातवीच्या वर्गातील मुलांनी आपली पुस्तकं शाळेत आणायची नाहीत.त्याऐवजी मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेली मराठी,हिंदी,गणित,सामांन्य विज्ञान,इतिहास,भुगोल आदि विषयांची पुस्तकं बेंचवरील दोन मुलांमध्ये एक या प्रमाणे ठेवण्यात येतात.त्यातून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा असतो.तसेच लागोपाठ दोन तास एकाच विषयाचे ठेवले जातात.शिवाय मुलांच्या दररोजच्या भागात घेतला जाणारा संपूर्ण स्वाध्याय महिन्या अगोदरच तयार ठेवला जातो.यामध्ये एक वस्तुनिष्ठ,एक लघुत्तरी,दिर्घोत्तरी आणि एक मुक्तोत्तरी आदि प्रश्नांचा सहभाग असतो.यामुळे कोणत्या दिवशी शाळेत कोणता विषय शिकविला जाणार आहे याचीही अगोदरच माहिती विद्यार्थ्यांना असते.दररोज चार तासात शिकविलेला अभ्यासक्रम विद्यार्थी घरी दिलेल्या पुस्तकातून अथवा प्रश्न संचातून सोडवू शकतात.त्यामुळे त्यांना घरची पुस्तकं शाळेत आणण्याची गरज पडत नाही.
शुन्य दफ्तर योजनेचे विविध फायदे विद्यार्थ्यांना मिळू शकतात.अभ्यासक्रमाची मांडणी केली जाते,दफ्तराचे ओझे न राहता मन प्रसन्न राहते,एक तास अध्यापन आणि एक तास सरावासाठी मिळतो,पालकांना घरी मुलांचा अभ्यास घेता येतो,परीक्षेच्या तयारीला वेळ मिळतो,शनिवारी एक तास तपासून इतर वेळ पाठांतराला देता येतो,ज्ञानरचनावादाची संकल्पना साकारता येते,शिक्षक पालक संबंध दृढ होतात.
राजेंद्र नाईक यांनी प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या या योजनेचे तालुक्यात कौतुक होत आहे.