व्यथा एका पत्रकाराची*…(भाग 2)————————————————-*
सलग आणि अखंडपणे 33 वर्षे साप्ताहिक चालविणारया गो. पी. लांडगे यांना सांगितलं जातंय.. “तुमची पत्रकारिता 30 वर्षांची नाही*..
गो. पी. लांडगे हे धुळ्याचे जेष्ठ पत्रकार.. वय वर्षे 71..साने गुरूजी आणि राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात वाढलेल्या आणि घडलेल्या गो. पी. लांडगे यांनी आयुष्यभर अत्यंत निष्ठेनं, सचोटीनं आणि प़ामाणिकपणे पत्रकारिता केली.. लेखणीच्या माध्यमातून सामांन्य, गरीब लोकांना न्याय मिळवून देताना कधी त्यांनी लाभ तोट्याचा विचार केला नाही…तटस्थपणे आणि व़त समजून अन्यायाच्या विरोधात लढा लेखणी चालविली.. नर्मदा बचाव आंदोलनात मेधाताई सोबत राहून विविध दैनिकांना आंदोलनाचं वृत्तांकन केलं.. प्रकल्पग्रस्तांच्या वेदना प्रत्यक्ष अनुभव घेऊन शब्दबद्ध केल्या.. .. पत्रकारांच्या चळवळीतही ते नेहमीच आघाडीवर राहिले.. पत्रकार संरक्षण कायदा व्हावा आणि ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेने ऊभारलेलया राज्यव्यापी चळवळीत ते सक़ीय राहिले..गो. पी. लांडगे यांच्यासारख्या असंख्य पत्रकारांमुळे सरकार झुकले आणि राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन सुरू झाली.. पेन्शन तर सुरू झाली पण “पेन्शन सरकारनं का द्यावी किंवा पेन्शनसाठी सरकारकडे हात का पसरायचे” असे सवाल उपस्थित करणारे महाभाग पहिल्या यादीतच पेन्शनचे लाभार्थी ठरले आणि जे पेन्शनसाठी लढले ते गो. पी. लांडगे यांच्यासारखे पत्रकार उपेक्षेचे धनी ठरले.. गोपी लांडगे यांना पेन्शन नाकारताना त्यांचा कसा अवमान आणि छळ झाला याची कथा देखील नवीन सोष्टे याच्यासारखीच दर्दभरी आहे..गोपी लांडगे हे सलग आणि अखंडपणे ३३ वर्षे “एकला चलो रे” नावाचे साप्ताहिक चालवतात..साप्ताहिकांचा लंगोटीपत्र म्हणून हिनविणारयांनी एक वर्षभर अंक चालवून दाखवावा म्हणजे त्यामागचे कष्ट आणि वेदना दिसतील.. लांडगे 33 वर्षे हा अंक चालवत आहेत आणि 30 वर्षे त्यांच्याकडे सरकारची अधिस्वीकृती पत्रिका देखील आहे.. त्यांचं वार्षिक उत्पन्न देखील 2 लाखांपेक्षा कमी असल्याने आपण बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी पूर्णपणे पात्र आहोत याची खात्री त्यांना पटली आणि त्यांनी अर्ज केला.. अर्ज करताना त्यांची एक चूक झाली . एकला चलो रे या साप्ताहिकावर संपादक म्हणून त्यांचे नाव होते.. म्हणजे सरकारच्या लेखी ते निवृत्त झाले नव्हते.. मग त्यांना पेन्शन कशी देणार हा प़श्न आला.. खरं म्हणजे सरकारनं या योजनेला पेन्शन योजना न म्हणता सन्मान योजना म्हटलेलं आहे..सन्मानासाठी पत्रकार निवृत्त असला पाहिजे असे बंधन असण्याचे खरं तर कारण नाही.. तरीही “तुम्ही वर्किंग मध्ये आहात तुम्हाला या योजनेचा लाभ देता येणार नाही” असे लांडगे यांना लेखी कळविले गेले.. त्यानंतर त्यांनी मला फोन केला.. त्रागा करीत “मला तुमची पेन्शन नको” अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र मी त्यांची समजूत काढत नवे डिक्लेरेशन द्या अशी विनंती केली..केवळ माझा मान राखण्यासाठी त्यांनी एकला चलो वरील स्वतःचे नाव हटविले.. आता गोपी लांडगे *निवृत्त* झाले होते.. त्यांना मनोमन वाटले आता कोणताही अडथळा न येता पेन्शन मिळेल.. पण बाबूगिरी त्यांना माहिती नसावी.. त्यांचा अर्ज दुसरयांदा फेटाळला गेला.. यावेळी त्यांना कारण सांगितले गेले की, “तुमच्या पत्रकारितेला 30 वर्षे झालेली नसल्याने तुमचा अर्ज मंजूर करता येत नाही” असं जर होतं तर मग हे कारण अगोदर का सांगितलं गेलं नाही? दोन्ही वेळी नवी कारणं का सांगितली गेली? हा प्रकार पाहून गोपी लांडगे संतापले, चिडलेही.. त्यांचा हा संताप स्वाभाविक देखील होता.. कारण जे लांडगे हे सलग ३३ वर्षे एकला चलो रे हे साप्ताहिक चालवितात आणि 30 वर्षे त्यांच्याकडे सरकारने दिलेली अधिस्वीकृती पत्रिका आहे त्या लांडगे यांना तुमची पत्रकारितेला 30 वर्षे झालेली नाहीत असं सांगितले जात होते. ही अधिकारयांची मनमानी नाही तर काय आहे? तोंडं पाहून अर्ज मंजूर केले जातात या आमच्या आरोपाला यामुळेच बळकटी येते.. मला त्यांनी पुन्हा फोन केला.. ..झालेला प्रकार सांगितला.. .माझंही डोकं सुन्न झालं. जे गोपी लांडगे च्या बाबतीत घडलं होतं ते धुळ्यातील किमान तेरा पत्रकारांच्या बाबतीत घडलं.. त्यामुळंच या सर्वांनी 6 जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण केलं मात्र त्याची दखल घ्यायला कोणाकडं वेळ नव्हता.. अन्यायाच्या विरोधात आयुष्यभर लढणारी धुळ्यातील ही मंडळी स्वतः वरील अन्यायाला सामोरं जाताना प्रचंड संतापली असल्यास नवल नाही.. आता खरा प्रश्न सरकार या सर्वांना न्याय देणार का? अन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सारे काही करणार की नाही हा आहे.. गो. पी. लांडगे आज मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत.. त्यांच्या पत्नीवर नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे.. त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागली त्यात कारण नसताना सरकारी बाबू चे अडवणुकीचे हे धोरण.. लांडगे सारख्या स्वाभिमानी पत्रकाराला हे सारं असह्य झालं असलयास नवल नाही माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे हे कवी मनाचे संवेदनशील अधिकारी आहेत.. मात्र असे कळले की, काही हितसंबंधी अधिकारी अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत जाऊच देत नाहीत किंवा त्यांच्या पर्यत चुकीची माहिती पोहोचविली जाते.. पांढरपट्टे साहेबांना माझी विनंती आहे की, सन्मान योजनेच्या नावाखाली जो पत्रकारांचा अवमान केला जात आहे तो तर थांबविला पाहिजेच त्याचबरोबर ज्या अपात्र पत्रकारांना तोंडं पाहून पेन्शनची खैरात वाटली आहे त्याचीही चौकशी झाली पाहिजे.. हा मुद्दा घेऊन आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोतच..आणि रस्त्यावरही उतरणार आहोत.. .(क़मश:)*एस.एम.देशमुख*
11संपादक अनिल वाघमारे, Anil Mahajan and 9 others2 Comments15 SharesLikeCommentShare