तेलगू वृत्तवाहिनीत न्यूज अँकर म्हणून काम करणाऱ्या राधिका रेड्डी (वय ३६) यांनी रविवारी पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. राधिका यांच्या घरात पोलिसांना सुसाईड नोटही सापडली असून माझा मेंदूच माझा शत्रू आहे, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.
राधिका रेड्डी या ‘चॅनल व्ही ६’ या तेलगू वृत्तवाहिनीत वृत्त निवेदिका म्हणून कार्यरत होत्या. हैदराबादमधील मुसापेट परिसरात त्या आई- वडिलांसोबत राहत होत्या. राधिका यांना १४ वर्षांचा मुलगा असून त्याला मानसिक आजाराने ग्रासले होते. सहा महिन्यांपूर्वीच राधिका यांचा घटस्फोट झाला आणि त्या आई- वडिलांच्या घरी परतल्या.
गेल्या काही दिवसांपासून राधिका या डिप्रेशनमध्ये होत्या, अशी माहिती देखील समोर येत आहे. रविवारी कामावरुन परतल्यानंतर राधिका या थेट इमारतीच्या गच्चीवर गेल्या. तिथून उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. राधिका यांच्या बॅगेतून सुसाईड नोटही मिळाली आहे. यात त्यांनी माझा मेंदूच माझा शत्रू आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.
लोकसत्तावरून साभार