वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न अधिवेशनात
मांडणार -विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे
अहमदनगर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता
संघटनेतर्फे नगरमध्ये धरणे आंदोलन
प्रेस क्लबच्या वतीने आंदोलनास पाठिंबा
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्या रास्त आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगारमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु. त्यासोबत येत्या 19 नोव्हेंबरलाही अधिवेशनातही हा प्रश्न मांडू आणि वृत्तपत्र विक्रेत्यांची मागण्या मान्य करणार्यास सरकारला भाग पाडू अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांसदर्भात चर्चा केली. वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्या समजून घेतल्या. वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटीत कामगार म्हणून राज्यभर नोंदणी सुरु करावी तसेच विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करुन त्याचीही तात्काळ अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी विक्रेता संघटनेतर्फे हे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास प्रेस क्लब व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गणेश गांधी, ज्येष्ठ नेते सुनील गिते, पदाधिकारी प्रमोद पंतम, अरुण भंडांगे, संजय गोरे, संतोष कर्डिले, दत्तात्रय मारा, अमित पठारे, प्रमोद पाठक, सचिन अरणकल्ले, प्रमीला खरपे, पुरुषोत्तम बेत्ती, अमोल वाघमारे, धनंजय जव्हेरी, रामभाऊ लोंढे, धनंजय पुरोहीत, सुरेश फुलसौंदर आदींसह जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने आलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
विक्रेता संघटनेतर्फे ज्येष्ठ पत्रकार डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी भूमिका मांडली. विक्रेता संघटनेच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यात याव्यात, असे ते म्हणाले. संघटनेतर्फे यावेळी कार्यकारी अध्यक्ष शिवाजी काळदाते, सुदेश पाटणी यांनीही भुमिका मांडली. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी विक्रेत्यांच्या मागण्यांचे निवेदन सरकारला पाठवून त्यांची भावना कळविणार असल्याचे आश्वासन दिले.