वृत्तपत्रात समाजाला दिशा देणाऱ्या अग्रलेखांचाच अभाव’
पूर्वीच्या काळी वृत्तपत्रातील अग्रलेख विचार करायला लावत. गोविंद तळवलकरांच्या ‘हे राज्य पडावे ही श्रीं ची इच्छा’ हा अग्रलेख वाचून आम्ही उद्योग केला आणि राज्य पाडले. महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे वर्णन आणि दिशा देणारे अग्रलेख लिहिले जात असल्याने कोण काय लिहितात, याची उत्सुकता असे. मात्र अलीकडच्या काळात ‘पेज थ्री’ला महत्त्व आले आहे. प्रमुख इंग्रजी दैनिकांतही अग्रलेखाची जागा अन्य बातम्यांनी भरलेली असते. समाजाला दिशा देण्याचे काम ज्या अग्रलेखातून होते त्याचाच अभाव आता जाणवू लागल्याची खंत व्यक्त करीत मराठीत आता अग्रलेख वाचावा असे ‘लोकसत्ता’ हेच एकमेव वृत्तपत्र असल्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नमूद केले.
बीड येथे यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात सोमवारी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने या वर्षीचा (स्व.) स. मा. गग्रे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री सुरेश धस, आमदार जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित, आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, सभापती संदीप क्षीरसागर, स्वागताध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, संयोजक संतोष मानूरकर, वसंत मुंडे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. स. मा. गग्रे यांनी मराठी पत्रकारितेला दिशा देण्यासाठी आयुष्य वेचले. पत्रकारितेबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या सुरुवातीच्या काळात अग्रलेख वाचावा, असा आग्रह असे. नवा काळ, नवशक्तिमधील व गोविंद तळवलकर यांचे अग्रलेख महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना, राजकारणाला दिशा देणारे असत. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना तळवलकर यांनी ‘हे राज्य पडावे ही श्रीं ची इच्छा’ असा अग्रलेख लिहिला. त्यातून आम्ही बोध घेऊन सुंदरराव सोळंके, सुशीलकुमार शिंदे व दत्ता मोघे यांच्या मदतीने सरकार पाडले. त्यानंतर तळवलकरांनी ‘वेगात दौडले आठ मराठे’ असा अग्रलेख लिहिला. त्या वेळी संपादकांचे लिखाण वाचावे असे होते. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या संपादकांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले, आता काळ बदलला आहे. ‘पेज थ्री’ला महत्त्व आल्याने अनेक मोठय़ा दैनिकांमध्ये अग्रलेखाची जागा इतर बातम्यांनीच भरलेली असते. समाजाला दिशा देण्याचे काम ज्या संपादकीय लेखणीतून होणे आवश्यक आहे. त्याचाच अलीकडे अभाव आहे. मराठीत सध्या अग्रलेख वाचावे असे एकमेव ‘लोकसत्ता’ हे वृत्तपत्र असल्याचे त्यांनी सांगितले. संपादक गिरीश कुबेर यांनी पहिल्यांदा जागतिक स्तरावरील तेलाच्या अर्थकारणाचा विषय मांडला. जागतिक मंदीच्या चमत्कारिक काळाचे अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण कुबेर यांनी केले. अमेरिका निवडणुकीचे सोप्या भाषेत त्यांनी केलेले चित्रणही वाचकप्रिय झाले, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.