भाजपचे आमदार राम कदम यांचा वाचाळगिरीचा प्रताप ताजा असतानाच आता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आता भर घातलीये. माध्यमांमुळे समाजात राजकारणाची घाणेरडी प्रतिमा तयार झालीय आहे असं वादग्रस्त शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलंय. एवढंच नाहीतर माध्यम दाखवतात त्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात असा जावाईशोधही तावडे यांनी लावलाय.
मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी विनोद तावडे आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी कुणाला राजकारणात यायचंय असा प्रश्न तावडेंनी उपस्थित केला. त्यावर विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद आल्यानं राजकारणाला बदनाम करण्यासाठी माध्यम जबाबदार आहे असं मत तावडेंनी व्यक्त केलंय.
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असं वक्तव्य करणे हे धक्कादायक आणि संतापजनक आहे. त्यांनी सर्व माध्यमांची जाहीर माफी मागावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार एसएम देशमुख यांनी केली.भाजपनं आपल्या खासदार आमदारांसाठी एक 65 पानी आचारसंहिता तयार केली आङे.त्यामध्ये खासदार आमदारांनी माध्यमांशी कसे वागावे यावर काही सूचना केलेल्या आहेत.हे पत्रक विनोद तावडे यांच्यापर्यंत पोहोचले तरी नसावे किंवा या पत्रकातून मंत्र्यांना वगळले असावे असे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.राजकारण्यांना माध्यमांवर कोणत्याही गोष्टीचं खापर फोडण्याची सवयच असल्याची प्रतिक्रियाही देशमुख यांनी दिली आहे.
विनोद तावडे यांनी याआधीही वादग्रस्त निर्णय घेतल्यामुळे टीकेचे धनी झाले होते ‘आम्हा राजकीय नेत्यांना सगळंच फुकट द्यायची सवय असते. नागरिकसुद्धा जेवढे जेवढे फुकट मिळेल तेवढे बरं याच मूडमध्ये असतात,’ असं वक्तव्यही विनोद तावडे यांनी मागील वर्षी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात केलं होतं.
तसंच 2017 मध्ये पुण्यात भारती विद्यापीठ पदवी प्रदान कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी विनोद तावडे यांनी पीएचडीतील गैरकारभाराचा खुलासाच केला. खरंखोटं काय आहे माहित नाही. पीएचडी ही काॅपीपेस्ट तरी आहे. किंवा प्राचार्य होण्यासाठी आहे तर कुठे पगारवाढ होण्यासाठी तरी आहे. संशोधन हे नावाला आणि कॉपी पेस्ट जादा अशी स्थिती आहे असा धक्कादायक खुलासा विनोद तावडे यांनी केला होता.