विनोद जगदाळे ः चळवळीशी नातं सांगणारा पत्रकार
 
विनोद जगदाळे यांची आज टीव्हीजेए च्या अध्यक्षपदी निवड झाली आहेटीव्हीजेएला आपलं संस्थान समजणार्‍यांना चारीमुंडया चीत करून प्रचंड मताधिक्कयानं विनोदनं हे यश संपादन केलं आहे.चळवळीशी नाळं जुडलेला,सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करणारा,पत्रकारांच्या अडचणीत अर्ध्यारात्री धावून जाणारा आणि मैत्रीचा धागा कायम जपणारा विनोद एका मोठ्या संघटनेचा अध्यक्ष झालाय याचा आनंद सर्वांनाच आहे.विनोदचा पिंड बघता आता पत्रकारांवरील अन्यायाच्या विरोधात पत्रकार संघटनांचा आवाज अधिक बुलंद होणार आहे.विनोद जगदाळे यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छाय
विनोद जगदाळे यांचं न्यूज 24 चे ब्युरो चीफ म्हणून प्रमोशन झाल्यानंतर एक छोटा लेख लिहिला होता.आज विनोदची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तो लेख पुनश्‍च येथे देण्याचा मोह आवरत नाही.
करमाळयासारख्या  कायम दुष्काळी तालुक्यातील हिसरे नावाच्या छोट्या खेड्यातून  मुंबईत येऊन पत्रकारितेसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण करणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही.वडिल फायरब्रिगेडमध्ये असल्याने पत्रकारितेची कोणतीही पार्श्‍वभूमी नाही.असं असतानाही विनोद जगदाळे यांनी पत्रकारितेत महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून प्रवेश केला ़आणि नंतर ते इलेक्टॉनिक मिडियात स्थिरावले.अगोदर झी न्यूज,नंतर झी-24 तास आणि आता न्यूज-24 असा त्यांचा प्रवास झाला आहे.न्यूज-24मध्ये 2007 मध्ये रूजू झाल्यानंतर गेली सात-आठ वर्षे ते निष्ठेने तेथे कार्यरत राहिले.चॅनलमध्ये सतत बदल अटळ आणि अपरिहार्य असतात.पण विनोद जगदाळे यांनी मात्र पदोन्नती किंवा वाढीव पॅकेजकडे लक्ष न ठेवता  न्यूज-24 मध्येच निष्ठेनं काम करीत ेराहण्याचा निर्णय घेतला..त्याचं फळ आज त्यांना मिळालं आहे.न्यूज-24 चे मुंबई आणि महाराष्ट्रासाठीचे ब्युरो चीफ म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली आहे.विनोद जगदाळे यांचं मनापासून अभिनंदन.
विनोद जगदाळे याना खरं तर लष्करात जाऊन देशाची सेवा करायची होती.त्यासाठी कॉलेज जीवनात त्यानी एनसीसीच्या माध्यमातून धडेही गिरविले होते.परंतू या ना त्या कारणानं त्यांना ते जमलं नाही.मराठवाडा किंवा सोलापूरमध्ये पोरगा  पदवीधर झाला की,कुठं तरी संस्थाचालकाची मनधरणी करून शिक्षक किंवा क्लर्क म्हणून चिकटविण्याची पध्दत आहे.विनोदनं किंवा त्यांच्या घरच्यांनी रूळलेला हा मार्ग चोखळला नाही.पत्रकारितेचा मार्ग निवडला. खरं म्हणजे मुलगा पत्रकारितेत गेला म्हणजे बिघडला असंच आजही ग्रामीण भागात समजलं जातं.असं असतानाही विनोदला पत्रकारितेत जाऊन नाव कमविण्याची प्रेरणा त्याचे मोठे बंधू वसंत जगदाळे यांनी दिली,त्यासाठी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची पंधरा हजार रूपये शुल्क भरून तो अभ्यासक्रमही पूर्ण करायला लावला.बंधूची ही साथ मिळाल्यानंतर विनोदनं मुंबईत आणि इलेक्टॉनिक मिडियात कष्टपुर्वक स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला.हे करताना व्यक्तिगत जीवनात तसेच सार्वजनिक जीवनात अनेक अडथळे आले मात्र त्यांनी या सर्वावर मात करीत आपले मार्गक्रमण सुरू ठेवले.पेशानं पत्रकार असले तरी पिंड कार्यकर्त्याचा असल्याने ते  टीव्हीजेयूच्या माध्यमातन  पत्रकार संघटनेत  सर्कीय झाले, ,नंतर राज्य अधिस्वीकृती समितीवर त्यांची  नियुक्ती झाली  आणि आता न्यूज-24 सारख्या राष्ट्रीय वाहिनीचे ते ब्युरो चीफ झाले आहेत.सामाजिक बांधिलकी जपणारा,पत्रकारांच्या हक्कासाठी थेट रस्त्यावर उतरून आवाज देणारा ,पत्रकाराना मदत करण्यासाठी सतत धडपडणारा,दिलेल्या शब्दाला कायम जागणारा विनोद  एका वाहिनीचा मुंबई आणि महाराष्ट्राचा प्रमुख झाला याचा आनंद आम्हाला आणि विनोदवर प्रेम करणार्‍या प्रत्येक पत्रकाराला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतही विनोदचे महत्वाचे योगदान असून अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठण कऱण्यासाठीही विनोदनं सतत पाठपुरावा केला होता.मी तर म्हणेल अधिस्वीकृती समिती गठीत करण्याचं बरंचंसं श्रेय विनोद जगदाळे यांनाच द्यावं लागेल.
मागच्या आठवडयातच विनोदनं दोन पत्रकारांना त्यांच्या आजाराच्या काळात मदत मिळावी यासाठी खटाटोप करून आपल्या सामाजिक जाणीवांचा प्रत्यय आणून दिला होता. यापुर्वी पत्रकारांच्या हाकेला धावून जाण्याची भूमिका त्यांनी आणि शशिकांत सांडभोर यांनी अनेकदा पार पाडली आहे.मराठी पत्रकार परिषदेने स्थापन केलेल्या पत्रकार आरोग्य सेवा कक्षाचेही ते सदस्य आहेत.या कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरजू पत्रकारांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे ते सातत्यान सांगत असतात. विनोद जगदाळे यांचे पुनश्‍च मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here