पत्रकारांनी प्रामाणिक असलं पाहिजे,निस्पृह,निर्भिड,निःपक्ष असलं पाहिजे आणि स्वाभिमानीही असलं पाहिजे अशा अपेक्षा समाज पत्रकारांकडून व्यक्त करीत असतो.समाजाच्या या अपेक्षात गैर असं काहीच नाही.. मात्र पत्रकारांकडून ढीगभर अपेक्षा व्यक्त करणारा समाज पत्रकारांसाठी काहीच करायला तयार नसतो हे गैर आहे .एखादा पत्रकार आजारी पडला तर कोणीही त्याला मदतीचा हात देत नाही,पत्रकारावर हल्ला झाला तर समाजानं कधी निषेधाचं पत्रक काढल्याचं एकही उदाहरण माझ्यासमोर नाही.किंवा निवृत्तीनंतर अशा पत्रकारांचं जीवन किती वेदनामय,हालअपेष्टांमध्ये जातं याचीही कधी समाज किंवा सरकार दखल घेत नाही.विद्याभाऊ सदावर्ते यांच्याबाबतीत हेच घडलं.आयुष्यभर व्रत म्हणून पत्रकारिता केली. निवृत्तीनंतर जे भोग वाटयाला आले ते कोणाच्याही वाटयाला येता कामा नयेत अशीच माझी अपेक्षा आहे.गेली काही वर्षे विद्याभाऊ विविध व्याधींनी ग्रस्त होते.उत्पन्नाची साधनं नसल्यानं त्याचं उत्तर आयुष्य अत्यंत खडतर गेलं.एक गोष्ट मान्य केली पाहिजे की,मलाही त्यांच्यासाठी काही करता आलं नाही.दोन-तीन वेळा तसा प्रयत्न केला पण नाही जमलं.त्यामुळं परिस्थितीशी लढत लढतच भाऊंनी जगाचा निरोप घेतला.माझ्या माहितीतले आज किमान शंभर असे पत्रकार आहेत की,ज्यानी आयुष्यभर निष्ठेनं,प्रामाणिकपणे पत्रकारिता केली.मात्र या प्रामाणिकपणाचं फळ मिळण्याऐवजी त्यांना प्रामाणिकपणाची शिक्षाच मिळत राहिली .त्यांच्यासाठी कोणीच काही करीत नाही.ना सरकार काही करतंय,ना ही मंडळी ज्या वर्तमानपत्रात काम करायची ते काही करताहेत,ना समाज काही करतोय..आम्ही गेल्या दीड वर्षात 29 पत्रकारांना मदत केली.बीडच्या भास्कर चोपडेंचं ताजं उदाहरण आहे.मात्र संघटनांना मदतीसाठी मर्यादा आहेत.त्यामुळं समाजानंच प्रामाणिकपणे पत्रकारिता केलेल्या पत्रकारांना मदतीचा हात दिला पाहिजे असं माझं सांगणं आहे.जिवंत असताना आपण काहीच करीत नाही.दिवंगत झाल्यावर श्रध्दांजली वाहून आपल्या कामाला लागतो.
लोकमत आौरंगाबादला आल्यानंतर मराठवाड्यातील जी टीम लोकमतमध्ये होती त्यात विद्याभाऊ होते.संतोष महाजन,महावीर जोंधळे आदि हाडाचे पत्रकार या टीममध्ये होते.बाबा दळवी टीमचं नेतृत्व करीत होते.विद्याभाऊ वृत्तसंपादक होते.त्याकाळातला महाराष्ट्रातला सर्वोत्तम वृत्तसंपादक अशीच विद्याभाऊंची ख्याती होती.बातमीला चपखल शिर्षक देण्यात विद्याभाऊंचा हात कोणी धरू शकत नव्हते.अंकाची सर्वोत्तम मांडणी ही विद्याभाऊंची खाशियत होती.सुंदर हस्ताक्षर ही विद्याभाऊंना मिळालेली निसर्गाची देणगी होती.वेळ-काळाचं भान न ठेवता हा माणूस लोकमतसाठी झटत होता.परिणामतः लोकमत मराठवाडयात झपाटयानं वाढलं.या यशात विद्याभाऊंचा मोठा वाटा होता.मात्र श्रेय सहकार्यांना देणं मालकांना मान्य नसतं.अर्थात विद्याभाऊंनी कधी त्याची अपेक्षाही ठेवली नव्हती.मालकांशी पंगा न घेता ते काम करीत राहिले.त्याचा परिणाम असा झाला की,क्षमता असतानाही विद्याभाऊ लोकमतेच संपादक कधी झाले नाहीत.न्यूज एडिटरचं दुखणं असं असतं की,न्यूज एडिटर कायम न्यूज एडिटरच राहतात.ते सहसा एडिटर होत नाहीत.विद्याभाऊंची तीच अवस्था झाली.कालांतरानं विद्याभाऊंनी लोकमत सोडलं आणि मोठ्या आर्थिक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं.मदत झाली असती तर त्याचं जीवन सुसह्य होऊ शकलं असतं.तशी मदत कोठूनच झाली नाही.अधून-मधून त्यांच्या आजाराच्या बातम्या मिळत होत्या.ठरवूनही मला औरंगाबादला जाता आलं नाही.आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा आपण विद्याभाऊंसाठी काहीच करू शकलो नाही याचं दुःख नक्कीच वाटलं.सरकारनं वेळीच पेन्शन योजना सुरू केली असती तर मला खात्रीय की,त्याचं जीवन थोडं तरी सुसहय झालं असतं.सरकार नुसतंच पत्रकारांच्या तोंडाला पानं पुसत आहे.सरकारनं आता तरी फार वेळ न घालवता पेन्शन योजना तातडीनं सुरू करून प्रामाणिक पत्रकारांना आपल्या प्रामाणिकपणाचा पश्चाताप होणार नाही याची काळजी घेईल अशी अपेक्षा .विद्याभाऊंना विनम्र अभिवादन.