वाह ताज…
ताजमहाल शहाजहाननं बांधला की त्यानं ही इमारत बांधण्यापुर्वीच तेथे तेजोमहाल नावाचं शंकराचं मंदिर होतं,या वादात मला जायचं नाही कारण मी इतिहासाचा अभ्यासक नाही,आणि इतिहासाचं ज्ञान नसताना आपल्या सोयीचा इतिहास बोलणारा मी राजकारणी देखील नाही.ताजमहाल पाहून ताजच्या प्रेमात पडलेला मी एक रसिक नक्की आहे.काही दिवसांपुर्वीच दिल्लीला गेलो तेव्हा मुद्दाम सपत्नीक आग्र्याला गेलो.त्या अगोदरही एक-दोन वेळा आग्र्याला जाऊन ताज पाहिला होता.एकदा पोर्णिमेच्या दिवशी तेथे होतो.या इमारतीचं वैशिष्ठय असंय की,कितीही वेळा ही इमारत पाहिली तरी डोळ्याचं पारणं काही फिटत नाही.सपत्नीक आम्ही जेव्हा ताज पाहण्यासाठी गेलो तेव्हा दिवसभर तेथे फिरूनही ‘पोट भरलं’ नव्हतं.या इमारतीवरून नजर हटत नव्हती.अशीच अवस्था तेथे ताज पाहण्यासाठी आलेल्या हजारो पर्यटकांची होती.ताज बघत असताना तो कोणी बांधला? बांधणारा देशद्रोही होता की,देशभक्त होता ?,तो हिंदु होता की,मुस्लिम होता? असा कोणताही विचार डोक्यात येत नाही.ताजच्या सौदर्यात आपण एवढे मग्न झालेलो असतो की,हे सारे भेद निरर्थक वाटतात.ताज पाहून परतणारा प्रत्येक पर्यटक पुन्हा नक्की यायचं असा निर्धार करूनच ताजचा निरोप घेत असतो.या अप्रतिम,जगातील आश्चर्य समजल्या जाणार्या वास्तूला कोणी कलंक म्हणत असेल तर त्यानं ‘सोम’रस प्राशन करून हे विधान केलंय असं नक्की म्हणता येऊ शकेल.
ताजमहाल हा भारताचा गौरव आहे यात शंकाच नाही.याचं कारण भारतात पर्यटनासाठी येणारा प्रत्येक विदेशी पर्यटक ताज बघतोच बघतो.आम्ही ज्या दिवशी ताजमध्ये होतो त्या दिवशी देशी पर्यटकांपेक्षा विदेशी पर्यटकांचीच संख्या जास्त होती.भारतात पाहण्यासारखं काय आहे ? असं जेव्हा कोणी विचारेल तेव्हा ‘आमचा ताज आहे’ असं अभिमानानं सांंगू शकेल अशी ही वास्तू आहे.ती पर्यटन यादीतून बाद केल्यानं या वास्तूचं महत्व आणि आकर्षण कमी होणार नाही.पण मला वाटतं खरा मुद्दा ताजमहाल हा नाहीच.कारण तसं असतं तर भाजपचा एक आमदार ज्या वास्तूला कलंक म्हणत होता तीच वास्तू आमच्यासाठी गौरव आहे असं टाइम्स नाऊवरील चर्चेत भाजपचे प्रवक्ते सुधांसू त्रिवेदी सांगत होते.अन्य वाहिन्यांवरील चर्चेतही हिंदुत्ववादी परस्पर विरोधी बोलत होते आणि संघाचं प्रवक्ते स्पष्टपणे हा कलंक आहे असं सांगत नव्हते.म्हणजे ताजमहालचा वाद उकरून काढत देशात जे बुनियादी प्रश्न आहेत त्यापासून लक्ष विचलित करायचे,ढासळत चाललेली नरेंद्र मोदी यांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे,महागा,जीएसटी,नोटाबंदी,कर्जमाफी,शेतकरी आत्महत्या या सर्व आघाडयांवर सरकारला आलेलं अपयश झाकण्यासाठी नवा आणि भावनिक वाद उकरून काढायचा ही भाजपची नीती यातून स्पष्ट दिसते.कारण शहाजहान हा गद्दार होता तर आणि म्हणून त्यानं बाधलेला ताजमहाल गद्दारीच प्रतिक किंवा कलंक मानायचा तर मग लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी भाषण करणं आणि तेथून ध्वजारोहण करणं कसं चालतं,कारण लाल किल्ला देखील शहाजहाननंच बांधला होता.ओविसाचा हा मुद्दा गैरलागू नक्कीच नाही.देशात इंग्रजांनी बांधलेल्या देखील अनेक वास्तू आहेत आणि त्यांची नावंही आम्ही बदलू शकलो नाहीत ते सारं कसं चालतं ? हा प्रश्न आहे.एकटा ताजच हिट लिस्टवर का असावा ?.याचं कारण ताजचं अप्रतिम सौदर्य,ताजची लोकप्रियता,ताजबद्दल असलेले आकर्षण हे आहे.अनेकांसाठी प्रेमाचा विषय असलेला ताजचा वाद काढला गेला तर अन्य सार्या प्रश्नांपासून लोकांचं लक्ष अन्यत्र वेधले जाईल असा हा सापळा आहे.यामध्ये अडकण्याचं कारण नाही.कारण कोणी कलंक म्हणू देत नाही तर आणखी काही.कारण ताजचं सौदर्य ज्यांनी अनुभवलंय असा कोणताही भारतीय वाह ताज..किंवा आमचा गौरव म्हणूनच ताजचा उल्लेख करेल.
आणखी एक.ताजचा खरा इतिहास शोधून काढण्यात कोणालाच रस नाही.कारण काही गोष्टी अशा रहस्यमय असण्यातच राजकीय लाभ असतात.भाजपची सत्ता आहे.ताज हा शहाजहाननं बांधला नाही असं जर हिंदुत्ववाद्यांना वाटत असेल तर ते त्यांना सप्रमाण सिध्द करावे लागेल.एखादे पु.ना.ओक काय म्हणतात यावर ताजमहाल हा तेजोमहाल होता हे सिध्द होत नाही.सखोल संशोधन व्हायला खरं तर काहीच हरकत नाही.पण तसं होणार नाही.याचं कारण मंदिर वही बनाएंगेचे नारे द्यायचे आणि मंदिर काही बांधायचे नाही.बनाएंगे म्ङणत देशातील हिंदुंना झुलवत ठेवायचे तसेच ताजचे हे प्रकरण आहे.ताज भोवती संशयाचं धुकं कायम ठेवून राजकीय लाभ उठ विण्याचा हा प्रयत्न नक्कीच रसिक मनाच्या भारतीयांना तरी क्लेशदेणारा नक्कीच आहे.