आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरोढोण येथील ऐतिहासिक वाडयाला नवी झळाळी प्राप्त झाली असून वासुदेव बळवंतांचं बालपण ज्या वाड्यात गेलं तो वाडा आता पर्यटक आणि इतिहास प्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.1 कोटी 73 लाख रूपये खर्च करून पुरातत्व विभागाने फडके वाड्याचा जिर्णोध्दार केला आहे.
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी पनवेल नजिकच्या शिरढोण येथे झाला.त्यांचे आजोबा अनंतराव फडके हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते.मात्र 1820 नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर फडके कुटुंब शिरढोणच्या वाड्यात वास्तव्यास आले.तेथेच वासुदेव बळवंत यांचा जन्म झाला आणि बालपणही गेले.मात्र कालौघात या ऐतिहासिक वाड्याकडं दुर्लक्ष झालं.वाडा नामशेष व्हायच्या मार्गावर असतानाच स्थानिक जनता आणि इतिहास प्रेमींनी पाठपुरावा केल्यानं आणि तत्कालिन आमदार विवेक पाटील यांनी हा विषय विधानसभेत मांडल्यानं वाड्याची डागडुजी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला.त्यासाठी 1 कोटी 73 लाख रूपयांचा निधी मंजूर कऱण्यात आला.त्यातून पुरातत्व विभागानं वाड्याची दुरूस्ती केली असून पुर्वीच्या अवस्थेतील हा वाडा आता पर्यटकांना आकर्षित करीत आहे.वाड्याची दुरूस्ती करताना मुळ ढाचा बदलणार नाही याची काळजी घेतली गेली आहे.बांधकामासाठी चुना,मेथी,गुळ तसेच बेल फ ळाच्या मिश्रणातून या वाड्याच्या भिंती उभ्या केल्या गेल्या आहेत.लाकूडकामासाठी सागाच्या लाकडाचा वापर केला गेला आहे.वाड्याच्या सभोवताली सुंदर बगीचा तयार होत असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळाही उभारण्यात येणार आहे.पुरातत्व विभागाने वेळेत हे काम पूर्ण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.