नांदेड येथे होणाऱ्या पत्रकार संघाच्या अधिवेशनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा…….
रिसोड (प्रतिनिधी):-
17 व 18 ऑगस्ट 2019 रोजी नांदेड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनास वाशिम जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिसोड येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई सलंग्नीत वाशिम जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना माधवराव अंभोरे यांनी केले.
रिसोड येथे दिनांक 14 जुलै 2019 रोजी स्वर्गीय अॅड.आप्पासाहेब सरनाईक सभागृहामध्ये वाशिम जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची द्वैमासिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे हे होते यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून मूर्तिजापूर येथील प्राध्यापक अविनाश बेलाडकर ,तसेच मंचावर पत्रकार संघाचे अमरावती विभागीय सचिव जगदीश राठोड, सरचिटणीस वाशिम जिल्हा पत्रकार संघ विश्वनाथ राऊत, अजय ढवळे कार्याध्यक्ष वाशिम जिल्हा पत्रकार संघ, नंदूभाऊ शिंदे कार्यालयीन सचिव वाशिम जिल्हा पत्रकार संघ, प्रा. नंदलाल पवार, प्रा. अरविंद गाभणे,गोपाल पाटील भोयर, गणेश भालेराव, प्रवीण ठाकरे,जयंत वसमतकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मंचावरील मान्यवरांचा रिसोड तालुका पत्रकार संघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंतराव हराळकर, भगवानराव निर्बाण, शंकरराव हजारे,ताराचंद वर्मा,प्रा.डॉ. दिवाकर इंगोले,आप्पाजी महाजन यांचा स्टेजवरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच मिडिया सेल च्या वाशिम जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल मदन देशमुख व जिल्हा निमंत्रक पदी निवड झाल्याबद्दल हरिदास बनसोड, तंटामुक्ती मूल्यमापन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रफुल बानगावकर कारंजा,योगेश देशमुख मानोरा,नाना देवळे मंगरूळपीर, यशवंत हिवराळे मालेगाव, रमेश उंडाळ वाशिम, गजाननराव बानोरे रिसोड, सुदर्शन टीव्ही जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल अमोल रघुवंशी व युवा पत्रकार नामदेव पतंगे मालेगाव यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना माधवराव अंभोरे म्हणाले की जिल्ह्यातील पत्रकारांच्या पत्रकार भवनाच्या निर्माणाधीन असलेला प्रश्न लवकरच मार्गी लागेल, पत्रकार सुरक्षेसंबंधी होऊ घातलेल्या कायद्याची अंमलबजावणी होणे यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहेत.
यावेळी विभागीय सचिव जगदीश राठोड यांचेही समयोचित भाषण झाले. सभेस मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्राध्यापक अविनाश बेलाडकर यांनी पत्रकारिता काल आज आणि उद्या या विषयावर पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करताना आपल्या लेखणीतून नीतिमूल्यांचा विसर पडू देऊ नका असे आवाहन याप्रसंगी केले. पुढील महिन्यात नांदेड येथे होऊ घातलेल्या अधिवेशनास जिल्ह्यातून 250 हून अधिक पत्रकार बांधव उपस्थित राहतील असे आश्वासन या प्रसंगी उपस्थित पत्रकारांनी माधवराव अंभोरे यांनी अधिवेशनास उपस्थित राहण्या संदर्भात केलेल्या आवाहनाला साद देताना सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक विजय देशमुख यांनी केले तर आभार काशिनाथ कोकाटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिसोड तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी कठोर परिश्रम घेतले.