अलिबाग- रायगड जिल्हयात सातत्यानं घडत असलेल्या वाळित प्रकरणांची जिल्हा प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून असे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई कऱण्याचा इशारा जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीनं प्रसिध्दीस देण्यात आलेल्या एका पत्रकात जिल्हयात वाळित टाकण्याचे 27 प्रकार विविध पोलिस ठाण्यांंतर्गत घडले असून या प्रकरणात 290 जणांवर गुन्हे दाखल केले गेल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीनं प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रबोधन कण्यात येत असून त्यासाठी गावपातळीवरच्या तंटामुक्त गाव समित्यांना सक्रीय करण्यात येत आहे.न्यायालयांमार्फत लोकांना यासंबंधीच्या कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळांचेही आयोजन केले जात आहे.फौजदारी संहिता 1973च्या कलम 107,109,110 नुसार कारवाई केली जात असल्याचेही प्रसिध्दी पत्रकात नमुद कऱण्यात आलं आहे.अशी घटना समोर आल्यास तहसिलदार आणि संबंधित ठाण्यातील पोलिस निरीक्षकांनी तातडीने घटनास्थळास भेट द्यावी असेही सांगण्यात आले आहे.