वड्रांची मुजोरी

0
913

जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी आधीच अडचणीत आलेले रॉबर्ट वड्रा यांनी माध्यम प्रतिनिधींशी बेताल वक्तव्य करून स्वतःला आणखी अडचणीत आणले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई असल्याने स्वाभाविकच त्यांच्या या बेताल वक्तव्याला राजकीय रंग आला. प्रियांका गांधी यांचे पती हीच वड्रा यांची देशाला खरी ओळख असल्याने या वादाला राजकीय वळण मिळणे स्वाभाविक आहे. काँग्रेस सत्तेवर असताना वड्रांनी व्यवसाय वाढविला आणि हरयाणामध्ये जमिनीचे व्यवहार करताना सत्तेचा गैरवापर केला असा आरोप त्यांच्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात या आरोपांचा उल्लेखही केला. केंद्रानंतर आता हरयाणातही सत्तांतर झाले असून, वड्रा यांच्या कथित गैरव्यवहारबाबत कायद्यानुसार कारवाई होणार असल्याचे तेथील नवे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकाराने वड्रा यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर ‘नो कॉमेंट्स’ असे उत्तर देण्याचा किंवा मौन बाळगण्याचा अधिकार वड्रा यांना निश्चित होता. मात्र, त्यांचा तोल गेला आणि त्यांनी चक्क माइक हाताने झिडकारला. हे वर्तन उद्दामपणाचे होते. जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे की नाही, हे तपासाअंती सिद्ध होईलच; पण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण देश ही आपली ‘जहागिरी’ आहे, अशा थाटात वावरण्याची मिजासखोरी त्यांना करून चालणार नाही. वड्रा अजून वास्तवात आलेले नसावेत. केवळ काँग्रेस सत्ताभ्रष्ट आहे म्हणून नव्हे, तर जनतेने आता कोणत्याही राजकारण्यांच्या हातामधील बाहुले न होण्याचा केलेला निर्धार अजूनही वड्रा यांना समजलेला दिसत नाही. राजकीय-सामाजिक अधिकारपदावरील व्यक्तींच्या जवळच्या घटकांनी हे भान राखण्याची आणखी गरज आहे. भाजपसहित राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील वड्रा यांच्या वर्तनावर कडक टीका केली. वड्रांचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसजन करीत आहेत. हा राजकारणाचा भाग आहे.

माध्यमांकडून गैरसोयीचे वा कोंडीत पकडणारे प्रश्न विचारले जाताच वड्राच नव्हे, तर अनेक नेते भडकतात; संबंधित पत्रकाराला तंबी देतात. त्यामुळे वड्रांसह अशा सर्व नेत्यांनी संयम बाळगण्याचे धडे घेण्याची गरज आहे. गरीब बिचारा मतदार हे सारे पाहतो आहे. यापुढे कोणीही ‘बनाना रिपब्लिक’ म्हणून मतदाराला गृहित धरले त्याला जनताच धडा शिकवेल!      ( महाराष्ट्र टाइम्समधील स्फूट – साभार )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here