रोहिणी सिंह ‘हाजीर हो’ !

0
926

२०१४ साली केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय याच्या कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये १६ टक्कयांनी वाढ झाली, असा गौप्यस्फोट करणाऱ्या ‘द वायर’ या वृत्तवेबसाईटच्या पत्रकार, संपादक आणि इतर संपादक मंडळाविरोधात गुजरातच्या जिल्हा न्यायालयाने समन्स जारी केले आहे. या सगळ्यांना १३ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

८ ऑक्टोबर रोजी ‘द वायर’ या वृत्तवेबसाईटने जय शहा यांच्या टेंपल एटंरप्राईज प्रायव्हेट लिमेटेड या कंपनीच्या टर्नओव्हरचा अहवाल प्रसिद्ध केला होता. यात जय यांच्या कंपनीचा टर्नओव्हर पाच हजारावरून ८०.५ कोटी रुपये इतका झाल्याचे नमूद करण्यात आले होते. भाजप २०१४ साली सत्तेत आल्यानंतरच जय यांच्या कंपनीचे नशीब फळफळल्याचे यात सांगण्यात आले होते. पत्रकार रोहिणी सिंह यांनी हे वृत्त दिले होते. या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली होती. अमित शहा यांनी या वृत्ताचे खंडन केले होते. माझ्या मुलाने सरकारसोबत एका रुपयाचाही व्यवहार केलेला नाही. कोणतीही सरकारी जमीन हस्तगत केलेली नाही, असे त्यांनी म्हटले होते. तर ‘द वायर’ विरोधात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार, असे जय यांनी म्हटले होते.

शहा यांनी पत्रकार रोहिणी सिंह, संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन, सिद्धार्थ भाटीया, एम के वेणु, प्रबंधकीय संपादक मोनोबीना गुप्ता, पामेला फिलीपोज व स्वयंसेवी संस्था ‘द फाऊंडेशन फॉर इंडिपेंडेंट जर्नेलिझम’यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

न्यायालयात जय शहा यांच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. तसेच शहा यांचे वकील एस वी राजू यांनीही त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडली आहे. यात द वायरने घाईत कुठलीही शहानिशा न करता हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हे वृत्त अपमानजनक असून दिशाभूल करण्याबरोबरच शहा यांची बदनामी करणारे आहे. यामुळे शहा यांची प्रतिमा डागाळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती शहा यांच्या वकिलाने न्यायालयाकडे केली आहे.

सामना वरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here