अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बंदराजवळ नांगर टाकून उभ्या असलेल्या प्रियंका या जहाजाचा नांगर सोमवारी अचानक तुटल्याने ते भरकटले आणि त्यावरील 16 कर्मचाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला.मात्र तातडीने हालचाल झाल्याने पाच जणांना जीवरक्षक बोटीतून बाहेर काढण्यात आले तर उर्वरित अकरा जणांना तटरक्षक दलाच्या हेलिकॉफ्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याने जिवित हानी टळली.मात्र 1900टन लोखंड घेऊन उभे असलेले हे जहाज आता पूर्णतः गाळात रुतून बसल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली.मुंबईकडून रेवदंड्यास आलेल्या या जहाजाचा तुफानी लाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नांगर तुटून ते भरकटल्याची वर्दी मुंबईच्या मेरिटाइम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरला सोमवारी दुपारी मिळाली.त्यानंतर बचावकार्यास वेग आला.जहाजावरील कर्मचाऱी सुरक्षित असले तरी आता गाळात रुतलेले हे अवाढव्य जहाज बाहेर कसे काढायचे हा मोठाच प्रश्न आहे.वेल्समन मॅक्स कंपनीचे हे जहाज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.