मुंबई-टीव्ही पत्रकार प्रशांत त्रिपाठी यांचा रिक्षा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. प्रशांत त्रिपाठी यांना वाशीला जाण्यासाठी कुर्ला स्थानकातून शेवटची लोकल गाठायची होती त्यामुळे
त्यांनी कुर्ला स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा केली. मात्र रात्री १२.५० च्या सुमारास त्यांच्या रिक्षेला दुसरी रिक्षा येऊन धडकली. या अपघातात प्रशांत त्रिपाठी यांचा मृत्यू झाला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अपघात झाल्यावर तातडीने त्रिपाठी
यांना भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
रिक्षा चालकाला पोलिसांनी बेजबाबदारीने वेगात रिक्षा चालवल्याप्रकरणी अटक केली आहे. एक रिक्षा चालक फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतो आहे. प्रशांत त्रिपाठी यांनी IBN-7 आणि P7 या दोन वाहिन्यांसाठी काम केले आहे. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आली आहे. भाजप नेते आणि प्रशांत त्रिपाठी यांचे एकेकाळचे सहकारी संजय प्रभाकर यांनाही ही बातमी समजली. त्यांनी प्रशांत त्रिपाठींच्या अपघाती मृत्यूबाबत शोक व्यक्त केला. प्रशांत त्रिपाठी हा एक चांगला पत्रकार होता. त्याचे वागणेही आदरयुक्त होते अपघातात आपण एक चांगला मित्र गमावून बसलो आहोत अशी प्रतिक्रिया संजय प्रभाकर यांनी दिली.
लोकसत्तावरून साभार