नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता आणखी एक संकट उभं राहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आता नामशेष होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेण्यासाठी आवश्यक पात्रतेच्या निकषांमध्ये राष्ट्रवादी बसत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाला कारणे दाखवा नोटीसही पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी लोकसभा निवडणुकीत किमान चार राज्यांमध्ये प्रत्येकी सहा टक्के मतं मिळवणं आवश्यक असतं, किंवा देशातील किमान चार राज्यांमध्ये हा पक्ष राज्यस्तरीय पक्ष म्हणून ओळखला जाणं आवश्यक असतं, किंवा लोकसभेच्या 543 जागांपैकी दोन टक्के जागा तीन राज्यात मिळवणं आवश्यक आहे.
या तीनही निकषांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बसत नसल्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेतला जाऊ नये असा सवाल निवडणूक आयोगाने विचारला आहे.फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर मायावती यांचा बसपा आणि भाकप यांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाण्याची शक्यता आहे. या तिन्ही पक्षांना 27 जूनपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यायचं हे.या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा नामशेष झाला तर देशात फक्त भाजप, काँग्रेस आणि सीपीआय(एम) हेच राष्ट्रीय पक्ष असतील. ( abp maza)