पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी
रायपूरच्या पत्रकारांनी पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधाचा अनोखा मार्ग अवलंबिला आहे.शहरातील सर्व पत्रकार हल्ली हेल्मेट घालूनच भाजप नेत्यांच्या पत्रकार परिषदा,बैठकांना उपस्थित राहतात.एवढंच नव्हे तर त्यांचे बाईट घेताना देखील पत्रकारांनी डोक्यावर हेल्मेट परिधान केलेलं असतं.
वाचकांना स्मरत असेल की,चार दिवसांपुर्वी भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजपचे रायपूर जिल्हाअध्यक्ष राजीव अग्रवाल आणि अन्य पदाधिकर्यांनी सुमन पांडे नावाच्या पत्रकारास मारहाण केली होती.पांडे हे भाजपच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते.त्यांच्यासमोरच पक्षातील दोन गट परस्परांवर भिडले आणि बैठकीत मारामारी सुरू झाली.याचं चित्रण पांडे यांनी केलं होतं.ते आपली डयुटी करीत होते.मात्र यामुळं राजीव अग्रवाल याचं पित्त खवळलं आणि त्यांनी पांडे यांना मारहाण केली.याप्रकरणी पांडे यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि अग्रवाल यांच्यासह चार पदाधिकार्यांना अटकही झाली.मात्र राजीव अग्रवाल यांना जिल्हाध्यक्षपदावरू काढून टाकावे अशी पत्रकारांची मागणी आहे मात्र ती मागणी पक्ष मान्य करीत नसल्यानं पत्रकार हेल्मेट घालून याचा निषेध करीत आहेत.रायपूरच्या पत्रकारांनी आता पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी केली आहे.