रायगड वार्तापत्र

रायगड जिल्हयावर दुबार पेरणीचं संकट 

रायगड जिल्हयात पावसानं गेली पंधरा दिवस दडी मारल्यानं जिल्हयातील शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागतं की,काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.जिल्हयात जूनच्या आरंभी पाऊस झाला.त्यावर विसंबून शेतकर्‍यांनी भात पेरणीची कामं पूर्ण केली.शंभर टक्के पेरणी झाली.मात्र नंतर कडक उन आणि पावसानं दडी मारल्यानं अनेक ठिकाणी उगवलेले भाताचे कोंब करपू लागले असल्याने शेतकरी चिंतेत आहे.दुबार पेरणी करावी लागली तर मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसणार आहे.त्यामुळं शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.येत्या दोन दिवसात कोकणात पाऊस येईल असा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलेला असल्याने त्या आशेवर आज शेतकरी आहेत.रायगड जिल्हयात सर्वाधिक पीक भाताचे घेतले जाते. यंदा खरीप हंगामाासाठी 1 लाख 14 हजार 443 हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी होणार आहे,त्यातील सर्वाधिक म्हणजे  1 लाख 5 हजार 261 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाईल.त्या खालोखाल 7,128 हेक्टरवर नागली,975 हेक्टरवर इतर तृणधान्य,906 हेक्टरवर तूर,आणि 173 हेक्टरवर कडधान्य लागवडीचे उद्दिष्ठ ठरविण्यात आलेले आहेत.भाताचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन जिल्हयात 40 हजार 715 क्विंटल बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली होती.तर शेतकर्यांच्या मागणीनुसार 24 हजार 600 मेट्रिक टन रासायनिक खताची उपलब्धता शेतकर्‍यांना करून देण्यात येणार आहे.

रायगड जिल्हयातील दिवसाला तीन ते चार अपघात

वाढलेली वाहतूक,राष्ट्रीय आणि राज्य महामर्गांची झालेली दुरवस्था,भरधाव वेगांनं जाणारी वाहनं,रस्त्यावरील खड्डे,इंडिकेटर न लावता रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहनं,मद्यपान पिऊन वाहन चालविणे,चुकीच्या पध्दतीनं ओव्हरटेक,दिशादर्शक फलकांचा अभाव,धोकादायक वळणं आदि कारणांनी रायगड जिल्हयातील रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत.जिल्हा पोलिसांच्या हद्दीत जिल्हयात दिवसाला किमान 3 ते 4 अपघात होतात.अपघातात होणारया मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.जानेवारी ते मे 2019 या कालावधीत रायगड जिल्हयात एकूण 469 अपघात झाले त्यामध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 505 जण जखमी झाले आहेत.रायगड जिल्हयातून मुंबई-गोवा,मुूूंबई-पुणे द्रुतगती मार्ग,मुंबई-पुणे जुना महामार्ग तसेच पळस्पे ते जेएनपीटी हे महामार्ग जातात.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली सहा सात वर्षे सुरू असल्याने वळणं आणि रस्त्यावर मोठया प्रमाणात राडारोडा पडलेला असल्याने या महामार्गावर देखील सततचे अपघात होतात.तसेच जे अंतर्गत रस्ते आहेत त्यांची चाळण झालेली असल्याने सातत्यानं अपघात होतात.अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जातात मात्र त्या तोकडया ठरत असल्याने रस्त्यांवरून जाताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 70 टक्के अपघात हे निष्काळजीपणामुळं वाहन चालविल्याने होतात,8 टक्के प्रकरणात पादचार्‍यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असतो,7 टक्के अपघात रस्त्यांच्या सदोष बांधणीने होतात,6 टक्के अपघात रस्त्यावरील खड्ड्यामुळं होतात,9 टक्के अपघात इतर कारणांनी होतात.मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण लवकर झाल्यास रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण कमी होईल असं मत पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांनी व्यक्त केलं आहे.

नाणारवरून रायगडमधील राजकारण तापणार

नाणार प्रकल्पाला आता रायगडची पृष्ठभूमी लाभणार अशी चिन्हं आहेत.रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात होणारा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळं रद्द करावा लागला.सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल,भारत पेट्रोलियम,आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून आकारास येणारा सुमारे तीन लोख कोटींचा नाणार प्रकल्प आता रायगड जिल्हयात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानं जिल्हयातील राजकारण देखील तापायला लागलं आहे.दक्षिण रायगडमधील अलिबाग,रोहा,श्रीवर्धन आणि मुरूड परिसरातील 40 गावातील 13 हजार 406 हेक्टरवर हा प्रकल्प होणार असल्याची चर्चा आहे.शेतकरी कामगार पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला असून सुपीक आणि निसर्गसंपन्न परिसर आम्ही उद्दवस्थ होऊ देणार नसल्याचे या पक्षानं जाहीर केलं आहे.या प्रकल्पाचा पर्यावरणावर परिणाम होईल असा शेकापचा दावा आहे.हा प्रकल्प जिल्हयातील एमआयडीसीच्या हजारो हेक्टर मोकळ्या जागेवर उभारावा अशी सूचना शेक ाप नेत्यांनी केली आहे.जिल्हयात शेकाप आणि राष्ट्रवादीची युती आहे.मात्र राष्ट्रवादीची यावरची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.येत्या विधानसभा निवडणुका नाणार रिफायनरी प्रकल्पाभोवती फिरत राहणार हे मात्र नक्की झालंय.

अलिबाग-विरार मल्टी कॉरिडॉर प्रकल्पाला गती मिळणार

रायगड जिल्हयातील काही भागाचा एमएमआरडीएमध्ये समावेश करण्यात आल्यानं उत्तर रायगडच्या विकासाला आता गती येणार असल्याने जिल्हयात समाधान व्यक्त होत आहे.कर्जत,खालापूर,पेण,अलिबाग तसेच पनवेल तालुक्याचा काही भागांचा एमएमआरडीएमध्ये समावेश करण्यात आला आहे.त्यामुळं जिल्हयातील प्रस्तावित मेट्रो-मोनो प्रकल्प,ट्रान्स हर्बर लिंक,धऱणाची कामं,नैना सिटी प्रकल्प,विरार ते अलिबाग मल्टी कॉरिडॉर हा बहूप्रतिक्षित प्रकल्प आदि महत्वाच्या प्रकल्पांना एमएमआरडीएकडून निधी मिळेल आणि त्यामुळं या प्रकल्पाना चालना मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.या प्रकल्पातून कर्जत परिसरातील आदिवासी वाडयांना वगळण्यात आलं आहे,त्याना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना देखील एमएमआरडीएमध्ये सामावून घेतले पाहिजे अशी मागणी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here