महाड ( दीपक शिंदे) – तिथीप्रमाणे साज-या होणार्या शिवजयंतीसाठी मशाली प्रज्वलीत करण्यासाठी किल्ले रायगडाकडे येत असतात. पण महाड शहराजवळील नातेखिंड येथील सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बांधलेल्या सिंहस्तंभाची अवस्था पाहील्यावर मान अभिमानाने ऊंचावण्याऐवजी शरमेने खाली जाते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात. आणि हे दुर्लक्ष शिवप्रेमी लोकप्रतिनिधी का खपवून घेतात.? या प्रश्नांनी हैराण झालेला शिवभक्त देखील काही बोलत नाही हे विशेष.
रायगड किल्ल्याकडे जाणारा महाड येथील नातेखिंड येथून सुरू होणारा मार्ग हा राजमार्ग व्हावा या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या णहाड विभागाने काही वर्षापूर्वी नातेखिंड येथे भव्य प्रवेशद्वार करण्याचे ठरविले. पण त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिंहस्तंभ बांधण्याचे ठरले आणि आकर्शक व शूर भासणारे सिंह व त्या स्तंभावर गोनिदांचे शिवस्फूरण देणारा परिच्छेद दुसर्या स्तंभावर राजा बढे यांचे महाराष्ट्र माझा हे काव्य कोरलेल्या मार्बल लाद्या लावल्या होत्या. पण टीकाऊ काम दाखवा अन् साबांला बक्षिस द्या अशी ख्याती असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने अभिमानास्पद असलेल्या या कामाकडे ढुंकूनही पाहीले नाही
आज या स्तंभावर एकही वाक्य नाही आणि बहुतांश लाद्या पडून गेल्या आहेत. सिंहावर इतकी चिकट धूळ आहे की त्यावर पावसाव्यतिरिक्त कधीच साफ करण्याकरता पाणो मारलेले नाही. या स्तंभासमोर अनावश्यक दुकानं थाटलीत की ज्यामुळे हे स्त॔भच लुप्त झाले आहेत. ”काळ्या छातीवरी कोरलो अभिमानाची लेणी” असा आशय असणारी वाक्य आता इथे पाहायला मिळत नसली तरी शेजारी असलेल्या सरकारमान्य देशी दारू दुकानातून बाहेर पडणारा तरूण हातातील काळी पिशवी अभिमानाने मिरवताना दिसतो. तिथे त्याच्यातील भक्त सिंहस्तंभासारखा लुप्त झालेला असतो. रात्री चायनीज श्वासाने आणि दारूड्यांच्या वासाने या स्तंभावरील गोनिदांच्या परिच्छेदातील आशय गुदमरल्यानेच या लाद्यांनी प्राण सोडला की काय असंच वाटतं.
एकंदरीत सार्वजनिक बांधकाम खात्याचा बेजबाबदारपणा आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचा लुटारूपणा मुळे रायगडाकडे जाणा-या सच्च्या शिवभक्तांचं आतडं पिळवटतंय. याकडं छत्रपतींचे नाव घेणार्या या सरकारमधील मंत्री किंवा साधा आमदार त्या गोनिदा आणि राजा बढे यांच्या काव्याला न्याय देतील काय…?