रायगड जिल्हयाला शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलं.शुक्रवारी रात्रभर कोसळत असलेला पाऊस शनिवारी दुपारनंतर कमी झाला मात्र दुपारनंतर पावसानं जोर धरला.सततच्या जोरदार पावसानं जिल्हयातील सावित्री,कुंडलिका,अंबा,पाताळगंगा,उल्हास आणि गाढी या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
निसरडा रस्ता,जोरदार पाऊस आणि अनेक ठिकाणी धुके असल्यानं मुंबई-गोवा महामागार्वर आज तब्बल दोन अपघात झाले.त्यात किमान २ ठार आणि ३५ जण जखमी झाले.महाडनजिक गांधारपाले येथे सकाळी दोन बसची समोरासमोर टक्कर होऊन एक ठार३० जण जखमी झाले.जखमींवर महाडच्या सरकारी रूग्णालायत उपचार करण्यात आले.दुसरा अपघात कोलाडनजिक आमटेम येथे झालेल्या अपघातात एक प्रवासी बस उलटून दहा जण जखमी झाले.दोन्ही अपघातांमुळे महामागार्वरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती नंतर ती धिम्या गतीनं सुरू राहिली.समुद्र खवळलेला असल्यानं दिवसभर किनाऱ्यावर लाटा धडकत होत्या.येत्या २४तासात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केल्यानं जिल्हाधिकाऱ्यानी सावधानतेचा इशारा दिला आहे.