रायगड जिल्हयात पथदर्शक स्वरूपात हवामानावर आधारित पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने त्याचे जिल्हयात शेतकऱ्यांंनी स्वागत केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात ही योजना राबविली जाणार आहे. रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणावर भात पिक घेतले जाते मात्र हवामानाच्या विविध घटकांचा पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याने त्याचा मोठा फटका नेहमीच शेतकऱ्यांना बसतो. मात्र आता पिक विमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना जिल्हयात राबविली जाणार असल्याने नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल.अपुरा पाऊस,पावसातील खंड,अथवा अतिवृष्टी या तीन हवामान घटकांच्या धोक्यापासून या विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार आहे.अधिसूचित महसूल मंंडळ स्तरावर कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास किंवा मत्स्यव्यवसाय विभागातर्फे ही योजना राबविण्यात येणार आहे.या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक अधिकारी रायगड यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.