रायगड लोकसभा मतदार संघात कालचा रविवार प्रचाराच्या दृष्टीनं कमालीचा धामधुमीचा गेला.सुटी असल्यानं आणि प्रचाराची मुदत संपायला आता काही तासांचाच अवधी राहिल्याने काल विविध पक्षांच्या नेत्यांच्या रायगडात सभा झाल्या,रॅलीच काढल्या गेल्या,आणि उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रचार केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी महाड आणि खेड येथे सभा घेतल्या.दोन्ही ठिकाणी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्यावर हल्ला केला.पेण आणि अन्य ठिकाणीही आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्या.
शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी मनोहर जोशी यांनी पालीत सभा घेतली.दिवसभरात अनंत गीते यांनी म्हसळा,मुरूड,तळ्यात सभा घेतल्या.
शेकापचे उमेदवार रमेश कदम यांच्या प्रचारासाठी आमदार जयंत पाटील यांनी रोह्यात सभा घेऊन तटकरे यांच्यावर तोफ डागली.अलिबाग येथेही नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या नेतृत्वाखाली एक प्रचार रॅली काढली गेली.
आम आदमी पार्टीचे संजय अपरांती यांच्या प्रचारासाठी रोह्यात अनके ठिकाणी सभांचे आयोजन केले गेले.
काल अनेक ठिकाणी एक किंवा दोन पक्षांच्या सभा,रॅलीज झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणेनं काळजी घेतली होती.