अलिबाग तालुक्यातील थेरोंडा,उरण तालुक्यातील नवापाडा आणि मुरूड तालुक्यातील एकदरा येथे तीन नवीन मच्छिमार जेट्टी बाधण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अविनाश नाखवा यांनी दिली.
रायगड जिल्हयात 240 किलो मिटरचा किनारा असून किनारा आणि खाडी लगतच्या 103 गावात मासेमारी चालते.जिल्हयातील 30हजार लोक या व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत.जिल्हयात पाच हजार मासेमारी नौका असून त्यामार्फत दरवर्षी जवळपास 40 हजार मॅट्रिक टन मस्त्य उत्पादन घेतले जाते.यातील 30 टक्के मासे युरोपात निर्यात केले जातात.मात्र जिल्हयात जेट्टीचा अभाव असल्याने मासेमारीत अडचणी येत होत्या.यापुर्वी वरसोली,चाळमाळा,कोंडारीपाडा,व बोर्लीमांडला येथील जेट्टी नुकत्याच बांधून पूर्ण झाल्या असून आता आणखी तीन जेट्टींना मंजुरी मिळाली असल्याने मच्छिमारांनी त्याचे स्वागत केले आहे.–