रायगडचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीला
माहित होणे आ़वश्यक- एस.एम.देशमुख
मुरुड : रागयडचा इतिहास समृध्द असून प्रेरणादायी आहे. चरीचा संप, चिरनेचा सत्याग्रह, महाड चवदार तळय़ाचा सत्याग्रह आणि जंजिरा संस्थान मुक्तीचा लढा क्रांतिविरांनी ज्या धैर्याने लढला, त्याला तोड नाही म्हणूनच हे शौर्याचे लढे नव्या पिढीने आवर्जुन जाणून घ्यावेत, असे महत्वपूर्ण प्रतिपादन मुरुड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड येथे ६७ वा जंजिरा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात पत्रकाल हल्लाविरोधी कृती समितीचे समन्वयक एस. एम. देशमुख यांनी केले.
जंजिरा मुक्ती दिनानिमित्तच्या वर्धापनदिनाच्या आयोजित केलेल्या कायक्रमात व्यासपीठावर एस. एम. देशमुख, जं. वि. मं. चे संचालक प्रमोद भायदे, मुख्यध्यापक उदय गद्रे, गटविकास अधिकारी संदीप जठार, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष विजय पवार, संतोष पवार, मुरुड ता. पत्रकार संघाचे अध्यक्ष मेघराज जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक संस्थानं भारतात विलीन झाली,पण जुनागड,जम्मू-काश्मीर,हैदराबाद,मुरूड जंजिरा आदि संस्थानं भारतात विलीन व्हायला तयार नव्हती.तेव्हा वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानात लष्कर घुसवून निजामाला शरण यायला भाग पाडले.तर जंजिराचा लढा स्वातंत्र्यप्रेमी जनतेने लढला.जनरेट्यासमोर मुरूडच्या नबाबाला शरण यावे लागले.कोणताही रक्तपात न करता पाच महिन्यांनी मुरूड स्वतंत्र भारतात विलीन झाले. स्वातंत्र्यसैनिक नाना पुरोहित, मोहन धारिया आदींनी मुरसद्देशिरीने प्रजापरिषदेमार्फत सिद्दीला नमवून पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा मनसुबा हाणून पाडला यावर त्यांनी प्रकाश टाकला.
सिद्दी अहमद खान यांची राजवट जुलमी नव्हती तसेच त्याकाळी हिंदू – मुस्लीम हा वादही नव्हता, तेव्हा जंजिरा मुक्ती संग्राम दिन मुरुड, म्हसळा व o्रीवर्धन या ठिकाणी ३१ जानेवारी या दिनी साजरा करावा, अशी त्यांनी मागणी केली. भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले असले तरी जंजिर्याला ते ३१ जाने. १९४८ रोजी तर मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी तर गोव्याला ते १९६१ मध्ये खर्या अर्थाने मिळाल्याची माहिती देण्यात आली.
सर. एस. ए. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी प्रभातफेरी काढत आझाद चौकात ध्वजारोहणासाठी गोळा झाले. नगराध्यक्ष अ. रहीम कबळे यांच्याहस्ते ध्वजवंदना करण्यात आली. युरोपच्या ख्रिस्ताइन, मरीना आणि बर्नाडेट या बेल्जीयमच्या महिला पर्यटकही सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर) जंजिरा मुक्ती दिनानिमित्त आझाद चौकात ध्वजवंदन करण्यात आले.( लोकमतच्या रायगड आवृत्तीत आज ही बातमी प्रसिध्द झाली आहे.)