मराठी पत्रकार परिषदेचे व्दैवार्षिक अधिवेशनं नियमित होतात.मात्र तीन वर्षापूर्वी परिषदेने जिल्हास्तरीय अधिवेशनाची कल्पना मांडली.त्याला विविध जिल्हयात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.जिल्हयातील पत्रकारांनी एकत्र यावं ,विचारांची देवाण-घेवाण करावी,आपल्या प्रश्नांची चर्चा करावी,त्यातून मार्ग शोधावा,गरजू पत्रकारांना मदतीचा हात द्यावाआणि पत्रकारितेची पत ,प्रतिष्ठा वाढविणार्या आणि उतकृष्ठ कार्य करणार्या पत्रकारांचा गौरव करावा यासाठी जिल्हास्तरीय अधिवेशनाचा आग्रह परिषदेने धरला.त्यानुसार पुणे,नागपूर,सांगली,या व अन्य जिल्हयात अधिवेशनं झाली.रायगडमध्ये तर ही संकल्पना पुर्वीपासूनच राबविली जात आहे.यावर्षी देखील 22 मार्च रोजी माथेरान येथे रायगड प्रेस क्लबच्यावतीनं प्रेस क्लबचा वर्धापन दिन आणि जिल्हास्तरीय अधिवेशन होत आहे.ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार आणि ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी जिल्हयातील आणि जिल्हयाबाहेरील काही पत्रकारांना पुरस्कार दिले जाणार आहेत.
अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनं देखील 26 मार्च रोजी अकोला येथे जिल्हास्तरीय अधिवेशन पार पडत आहे.आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे आणि एनडीटीव्हीचे प्रतिनिधी प्रसाद काथे,परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यावेळी उपस्थित राहून पत्रकारांना मार्गदर्शन करतील.अर्थातच या दोन्ही कार्यक्रमांना मी उपस्थित राहणार आहेच.