रायगड जिल्हा मावळ आणि रायगड अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेलाय.परिणामतः शेकापची शक्ती देखील विभागली गेलीय.त्यामुळं शेकापची स्थिती अशी झालीय की,शेकाप दोन्ही मतदार संघात स्वबळावर निवडून येऊ शकत नाही.1984 मध्ये जवळपास संपूर्ण रायगड जिल्हा कुलाबा मतदार संघात असताना शेकापनं स्वबळावर लोकसभा जिंकली होती.दि.बा.पाटील तेव्हा निवडून आले होते.त्यानंतर पुढील तीन निवडणुकीत म्हणजे 1989,1991,आणि 1996 मध्ये शेकापचा दारूण पराभव झाला होता.कॉग्रेसचे उमेदवार ए.आर.अंतुले तेव्हा विजयी झाले होते.शेकापनं पुन्हा दोन वेळा म्हणजे 1998 आणि 1999 मध्ये कुलाबा लोकसभा जिंकली होती.तेव्हा रामशेठ ठाकूर विजयी झाले होते.या विजयात देखील पक्षापेक्षा रामशेठ ठाकूर यांचा व्यक्तीगत करिष्माच जास्त प्रभावी ठरला होता.त्यानंतर रामशेठ कॉग्रेस मार्गे भाजपात डेरेदाखल झाले.त्याचा जबर फटका शेकापला बसला.2004 मध्ये शेकापच्या विवेक पाटलांचा पराभव झाला.ए.आर.अंतुले पुन्हा विजयी झाले.2008 मध्ये रायगड जिल्हयाचं विभाजन होऊन रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आले.शेकापच्या मतांचंही विभाजन झालं.अलिबाग,पेण,श्रीवर्धन आणि महाड हा रायगडचा दक्षिण भाग रायगडला जोडला गेला.उरण,पनवेल आणि कर्जत मावळला जोडले गेले .कुलाबा मतदार संघ असताना सारा जिल्हा या मतदार संघात असल्याने शेकापच्या विजयाची थोडी तरी शक्यता असायची.कारण जिल्हयात अडीच-तीन लाख मतं शेकापची होती.मात्र दोन मतदार संघ झाल्यानं शेकापच्या विजयाची शक्यता जवळपास मावळली.जिल्हयातील शक्ती विभागली गेली आणि दोन्ही मतदार संघांना अन्य जिल्हयातील काही विधानसभा मतदार संघ जोडले गेले.रायगडला रत्नागिरी जिल्हयातील गुहागर आणि दापोली जोडला गेला तर मावळमध्ये मावळ,पिंपरी आणि चिंचवड हे घाटावरचे तीन विधानसभा मतदार संघ जोडले गेले.शेकापची अडचण अशी की,जसे गुहागर,दापोलीत शेकापला कोणी ओळखत नाही तव्दतच मावळ,पिंपरी,चिंचवडमध्येही शेकापला कोणी विचारत नाही.
2014 मध्ये शेकापनं जरूर चाचपणी करून पाहिली.आयात केलेले रमेश कदम यांना रायगडमधून घोड्यावर बसविले गेले.पण हा घोडा धावलाच नाही.रमेश कदम यांना अवघी 1,29,730 मतं मिळाली.गंमत अशी की,अलिबाग,पेण,श्रीवर्धन आणि महाड विधानसभेसाठी शेकापला जेवढी मतं मिळाली होती तेवढी मतंही लोकसभेसाठी रमेश कदम यांना मिळाली नाही.उघडंय की,शेकापची मतं तेव्हा फुटली.इकडं मावळमध्येही शेकापनं लक्ष्मण जगताप यांना टेकू दिला होता.त्याचा उपयोग काहीच झाला नाही.कारण त्यांना 3,54,829 मतं मिळाली आणि ते मोठ्या फरकानं पराभूत झाले.लक्ष्मण जगताप यांना जी मतं मिळाली ती स्वाभाविकपणे त्यांच्या पिंपरी-चिंचवड-मावळ या परिसरातलीच.कर्जत,उरण आणि पनवेल विधानसभेत शेकापला 2,22,360 मतं मिळाली होती.लक्ष्मण जगताप यांना साडेतीन लाख मतं मिळाल्यानं या मतांमध्ये आमच्या सव्वादोन लाख मतांचा समावेश आहे असा दावा तेव्हा शेकापचे नेते करीत होते.वास्तव असं होतं की,इकडंही शेकापची मतं फुटली होती.मात्र शेकाप हे तेव्हाही मान्य करीत नव्हता,आजही करणार नाही. 2019 मध्येही यापेक्षा वेगळं काही घडण्याची शक्यता नव्हतीच.शेकापनं हे ओळखलं आणि लोकसभा निवडणुकीतून सपशेल माघार घेत दोन्ही मतदार संघावर पाणी सोडलं.निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन आपण राष्ट्रवादीवर उपकार करतो आहोत असा आभास जयंत पाटील यांनी निर्माण केला असला तरी ‘निवडून न येण्याची अगतिकताच’ या निर्णयामागे आहे हे स्पष्ट आहे.जयंत पाटील स्वतःला बिझनेसमन समजत असल्यानं निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेताना त्यांनी थोडा व्यवहार देखील पाहिलाच पाहिला.नाही तरी निवडून येत नाहीतच अशा स्थितीत आपल्या हातातील तीन लाख मतं राष्ट्रवादीला देत त्याच्या बदल्यात काही पदरात पडतंय का ते पहावं हा विचारही यामागं आहे.त्यामुळंच 2014च्या निवडणुकीतील आकडे समोर ठेवत जयंत पाटील यांनी अजित पवार यांना पार्थ पवार यांच्यासाठी गळ घातली.हे वास्तव स्वतः थोरल्या साहेबांनी टीव्हीवरून सांगितलं.राष्ट्रवादीनं निवडणुका लढविल्या तर आपण मतांची मोठी रसद पुरवू हे देखील जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या गळी उतरविलं आणि मग सारं गणित जुळलं.शेकापनं अजित पवारांना निवडणूक लढविण्यास भरीस पाडण्यामागं राष्ट्रवादीबद्दलचा आपला पुळका व्यक्त करणे हे तर कारण आहेच त्याचबरोबर काही राजकीय लाभ मिळणार असतील तर ते फक्त राष्ट्रवादीकडूनच मिळू शकतात हे देखील शेकाप नेत्यांना माहिती आहे हे देखील एक कारण आहे.सध्या दोन्ही पक्षात नव्यानं ‘याराना’ झालेला आहे.आम्ही मैत्रीला जागणारे कसे आहोत हे दाखवून देण्याची एकही संधी जयंत पाटील हल्ली सोडत नाहीत.रायगडमधून सुनील तटकरेंना उभं करणं आणि मावळमधून पार्थ पवारसाठी थोरल्या साहेबांना साकडं घालणं देखील या मैत्रीचाच (?) एक अध्याय होता. समजा उद्या पार्थ पवार विजयी झालेच तर ते आमच्या मतांच्या बिगादीमुळं ते विजयी झाले असं म्हणायला शेकाप नेते तयार आहेतच.समजा ते पराभूत झालेच तर आम्ही प्रयत्न केलाच पण घाटावरच्या मतांनी दगा दिला असा युक्तीवादही तयार असणार आहे.
रायगडमध्ये तर सुनील तटकरे निवडून येणार हे जयंत पाटील ओळखून आहेत.गेल्या वेळेस शेकापचा उमेदवार उभा असतानाही सुनील तटकरे अवघ्या 2000च्या आसपास मतांनी पराभूत झाले होते.त्यावेळेस सुनील तटकरे नावाच्या डमी उमेदवारानं साडेनऊ हजार मतं खाल्ली नसती तर तेव्हाच तटकरे जवळपास साडेसात-आठ हजार मतांच्या फरकानं विजयी झाले होते.शेकाप विरोधात असतानाची ही अवस्था .. म्हणजे उद्या सुनील तटकरे विजयी झाले तर केवळ शेकापच्या मदतीमुळंच विजयी झाले असं म्हणण्यासारखी स्थिती नाही.तो त्यांचा व्यक्तिगत करिष्माही आहे.शिवाय गेल्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये मोठं अंतर आहे.2014 ला मोदी लाट होती.आज तशी कोणतीच लाट नाही.शिवाय अनंत गीते यांनी मंत्रीपद असतानाही फार चमकदार कामगिरी केलीय असंही नाही.ही सारी परिस्थिती सुनील तटकरे यांच्या पथ्यावर पडणारी आहे.आणखी एक फॅक्टर आहे तो कॉग्रेसच्या प्रामाणिक मदतीचा.मधु ठाकूर याना ‘राहूल गांधींना पंतप्रधान करायचे असल्याने’ ते सुनील तटकरे की जय म्हणायला तयार झाले . .माणिक जगताप यांना महाड जिंकायचं असल्यानं ‘तटकरेसाहेब,तुम आगे बढो’चे सूर ते आळवत आहेत. सुनील तटकरे जर दिल्लीत गेले तर आपल्याला कोकणचं राण मोकळं मिळतंय हे ओळखून भास्कर जाधव देखील ‘सुनील तटकरे तुम आगे बढो’च्या गजरात स्वतःचा आवाज मिळवला आहे.तटकरेंना विरोध करणार्या अनेकांना असं वाटतं की,तटकरेंच्या विरोधात जोरदार अंडरकरंट आहे.शिवाय ज्या कॉग्रेसवाल्यांनी तटकरेंना पाठिंबा दिलाय तो वरवरचा आहे.आतून ते विरोधात काम करीत आहेत.मला असं वाटत नाही.जाहीरपणे जी भूमिका घेतली जाते तीच बहुसंख्य कार्यकर्त्यांना माहिती असते.गुपचूप कोणती खलबतं चालतात हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहचत नाही.त्यामुळं कॉग्रेसची मतं तटकरेंना पडणार असं अनुमान काढता येऊ शकतं.शिवाय सामांन्य माणसं समजतात तेवढे तटकरे कच्च्या गुरूचे चेले नाहीत.रायगडमधील प्रत्येक विरोधकाचा,समर्थकाचा विकपाँईट काय आहे हे तटकरेंएवढं कोणालाच माहित नाही.निवडणुकीच्या काळात ती नस बरोबर दाबतात आणि मग प्रवेशबंदीची भाषा करणारेही गुमानं कामाला लागतात.त्यामुळं कोणी काहीही म्हणत असलं तरी सुनील तटकेरेंना ही निवडणूक 2014 च्या कितीतरी पटीन सोपी आहे.अॅन्टीइन्कंबन्सीची मदतही तटकरेंना होणार आहे.
सुनील तटकरेंना विजयापर्यंत नेणारे हे सारे घटक असले तरी उद्या जेव्हा निकाल लागेल तेव्हा आमची दीड लाख मतं तटकरेंच्या पारडयात पडल्यानंच तटकरे विजयी झाले असा दावा सर्वात प्रथम जयंत पाटील करणार आहेत.हा दावा करताना जयंत पाटील यांचा डोळा लोकसभेनंतर येणार्या विधानसभा निवडणुकांवर असणार आहे.मात्र विधानसभेत जयंत पाटील यांना राष्ट्रवादीकडून फार काही मदत मिळेल असं मला वाटत नाही.यांनी जसे राष्ट्रवादीला दोन लोकसभा मतदार संघ आंदण दिले तसंही काही घडणार नाही.कारण जिल्हयात सात विधानसभा मतदार संघ आहेत.त्यातील दोन म्हणजे श्रीवर्धन आणि कर्जत राष्ट्रवादीकडं आहेत.या दोन्ही जागांवरचा दावा तटकरे कोणत्याही स्थितीत सोडू शकत नाहीत.कारण त्यांना आपल्या घरातील एका सदस्याला श्रीवर्धनचा आमदार करायचे आहे.तिकडं कर्जतमध्ये सुरेश लाडही जागा सोडणार नाहीत.त्यांचा बळी द्यायचं ठरलं तर ते गप्पही बसणार नाहीत.त्यामुळं या आघाडीवर हाती काही लागणार नाही.महाडवरचा दावा माणिक जगताप सोडणार नाहीत.पनवेलचा हट्टही कॉग्रेसवाले सोडणार नाहीत.उरले अलिबाग,पेण आणि उरण.अलिबाग आणि पेण सद्या शेकापच्या ताब्यात आहेत.या दोन्ही ठिकाणी शेकापला काही अडचण येणार नाही.उरणमध्ये अडचण येऊ शकते.तिथे राष्ट्रवादीची मदत होऊ शकते.पण उरणमध्ये राष्ट्रवादी फार प्रभावी आहे असं नाही.शिवाय तिकडं रामशेठ फॅक्टर महत्वाचा आहे.उरण शिवसेनेच्या ताब्यात असले तरी विवेक पाटील विजयी होऊ नयेत यासाठी रामशेठ पक्ष कोणता हे न बघता जिवाचा आटापिटा करतील.त्यामुळं हा याराना तिकडेही कामाला येईलच असं नाही.वरील सारी स्थिती असेल तर शेकापच्या वाटयाला फार काही येईल असं चित्र नाही.अनेकांना असं वाटतं की,लोकसभेच्या बदल्यात शेकापला एखादी राज्यसभेची जागा मिळू शकते.मला तसं वाटतं नाही.जे अंदाज प्रसिध्द होत आहेत ते आघाडीला 11-12 च्या पुढे जागा देत नाहीत.त्यातही राष्ट्रवादीच्या वाटयाला चार-पाचच जागा येणार असतील तर त्यांची इतरांना राज्यसभा देण्याची ऐपत असणार नाही.एखादी विधान परिषद मात्र मिळू शकते.चित्रलेखा पाटील यांना विधान परिषदेवर पाठविण्याची जयंत पाटील याची जुनी इच्छा आहे ती राष्ट्रवादीवाले पूर्ण करू शकतात.मात्र असं झालं तरी हा सौदा शेकापसाठी घाटयाचाच आहे.कारण लोकसभा न लढविण्यानं पक्षाचं जे नुकसान होणार आहे ते विधान परिषदेच्या एका जागेनं भरून येणारं नाही.लोकसभेतून माघार घेऊन जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अप्रत्यक्ष असा संदेश दिला आहे की,’रायगड आणि मावळमधून यापुढे आपण कधीच निवडून येऊ शकत नाहीत’.अशा राजकारणानं कार्यकर्त्याचं मनोबल नक्कीच खच्ची होतं.याचे दुरगामी परिणाम होणार आहेत आणि पक्षावर पश्चातापाची वेळही येणार नाही.एक काळ असा होता की,शेकाप हा राज्यातला दुसर्या क्रमांकाचा पक्ष होता.आज पक्षाचे तीन-चारच आमदार आहेत.याचं कारण रायगड वगळता पक्षानं विस्तारासाठी काही प्रयत्नच केले नाहीत.राज्यात शेकापचे जे बालेकिल्ले होते ते कधी रिडालोसला तर कधी आणखी कोण्या आघाडयांना आंदण दिले.जिल्हा परिषदा,पंचायत समित्या तर पक्षानं लढायचंच सोडलं.त्यातून कार्यकर्त्यांची पळापळ झाली.घरच्या भाकरी खाऊन ‘लाल बावटे की जय’ म्हणणारे कार्यकर्ते आज पक्षात नाहीत. जे होते त्यांची उपेक्षा करून,त्याना निवडणुका लढविण्यापासून परावृत्त करून शेकापनं ते गमविले.त्याचा परिणाम असा झाला की,’अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्ष’ रायगडपुरताच आणि तो ही काही तालुक्यापुरताच उरला.हा सारा इतिहास नजरेखालून घालता लोकसभा न लढविण्याची पक्षानं केलेली चूक भविष्यात पक्षासाठी घोडचूक ठरणार आहे.लोकसभा न लढविण्याच्या बदल्यात पक्षानं फार काही पदरात पाडून घेतलंय असंही दिसत नाही.घेतलं असेल तर जयंत पाटील यांनी तसं जाहीर करावं कारण ते कार्यकर्त्याचं मनोबल वाढविण्यासाठी आवश्यक आहे.रायगड आणि मावळमध्ये जिंकण्याची शक्यता नाही हे ठीक आहे पण आपलं अस्तित्व दाखविण्यासाठी,अस्तित्व टिकविण्यासाठी राजकीय पक्षांनी निवडणुका लढणं क्रमप्राप्तच असतं.सारेच पक्ष तसा प्रयत्न करतात.कार्यकर्त्यांना नवी उर्जा,नवा आत्मविश्वास,नवे चैतन्य,नवा हुरूप निवडणुकांच्या माध्यमातूनच मिळत असतो,या निमित्तानं नवे तरूणही पक्षाकडं आकर्षित होत असतात,पण राज ठाकरे असोत किंवा जयंत पाटील असोत त्यांना पक्षच वाढवायचे नसतील तर आपले हे सारे कथन वांझोटे ठरते.
रायगडमध्ये आणखी एक मतप्रवाह आहे, जयंत पाटील राष्ट्रवादीच्या उपकाराखाली दबलेले असल्यानंच त्यांनी रायगड आणि मावळ हे दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादील आंदण दिल्याची सुप्त चर्चा रायगडात आहे.मला असं वाटत नाही..जेवढं राष्ट्रवादीनं शेकापला दिलंय त्यापेक्षा जास्त माप शेकापनं राष्ट्रवादीच्या पदरात घातलेलं आहे.अर्थात ही देवाण घेवाण दोन पक्षातली नसून दोन कुटुंबातली आहे असं म्हणावं लागेल.या देवाण-घेवाणीला सुरूवात जिल्हा परिषदेपासून झाली.जिल्हा परिषदेत शेकापच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या असतानाही त्यानी तिसर्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना अध्यक्ष केलं.पक्षातील विरोध डावलून जयंत पाटील यांनी हा निर्णय सर्वावर लादला.याच्या बदल्यात मग राष्ट्रवादीनं बाळाराम पाटील यांना पदवीधरमधून विधानपरिषदेवर जायला मदत केली.पण त्याची किंमतही लगेच अनिकेत तटकरे यांना स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेवर पाठवून वसूल केली.हा सारा सौदा आपल्यासाठी घाट्याचा आहे हे जयंत पाटील पहात होते पण त्याना स्वतःची काळजी होती.त्यांना परत विधान परिषदेवर जायचं होतं.स्वतःच्या पक्षाचे तीन-चार आमदार असताना ते निवडून येऊ शकत नव्हते.त्यासाठी सुनील तटकरेंच्या मदतीची गरज होती.तटकरेंनी लोकसभेवर डोळा ठेऊन जयंत पाटलांची विधान परिषद नक्की केली.मग जयंत पाटलांना शब्दाला जागणं आवश्यक होतं.लोकसभेच्या दोन्ही जागांवर पाणी सोडण्यामागची ही राजकीय देवाण-घेवाणही आहे असं बोललं जातं.ही चर्चा पूर्णतः चुकीची आहे असं सकृतदर्शनी तरी दिसत नाही.ही देवाण-घेवाण झाली नसती तर दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला असता.भाजप-सेना सत्तेत आल्यापासून रायगडात शिवसेना वाढत होती.उत्तर रायगडमधून म्हणजे पनवेल-उरणच्या बाजुनं भाजपनंही जोरदार मुसंडी मारली होती.या वादळात टिकाव धरायचा तर एकमेकांचा हात धरल्याशिवाय पर्याय नाही हे सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी हेरलं आणि मग सुरू झाले ‘तुझ्या गळा,माझ्या गळा’चे प्रयोग.मग ‘झालं गेलं कुंडलिकेत बुडविण्याचं’ही ठरलं.तशा आणाभाका झाल्या.एका बलाढ्य शत्रूचा मुकाबला करण्यासाठी झालेली ही युती आणि त्या अगोदरचे या दोन नेत्यांमधील लढे हे नेते भलेही विसरायला निघाले असतील पण रायगडची जनता ते कदापिही विसरू शकत नाही.रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं निमित्त करून जयंत पाटील यांनी तटकरेंचे मंत्रीपदच काढून घ्यायला विलासरावांना कसं भाग पाडलं आणि राज्यात राजकीय अस्थितरता कशी निर्माण केली हे तटकरे आणि जयंत पाटील भलेही विसरतील पण राज्यातील जनता ते विसरणार नाही.ही झाली जुनी गोष्ट..अगदी अलिकडंही सुनील तटकरे यांनी असंख्य कंपन्या कश्या उभ्या केल्या,त्यातून कशी माया जमविली,याचा लेखाजोखा मांडणारी ‘काळी पत्रिका’ जयंत पाटील यांनी अलिकडेच प्रसिध्द केली होती.त्यामुळं चिडलेल्या सुनील तटकरे यांनी कृषीवलच्या संपादकांना एक कोटीच्या अबु्रनुकसानीची नोटीसही पाठविली होती.त्याचं पुढं काय झालं हे कोणालाच पुढं कळलं नाही.अर्थात हे वार एकतर्फी नव्हते.प्रसंगानुरूप सुनील तटकरे यांनीही पलटवार केलेले आहेत. ‘समोरच्याचं अस्तित्व आपल्या अस्तित्वासाठी घातक आहे’ असा विचार दोन्ही बाजुंनी होत असल्यानं दोन्ही नेते परस्परांना पाण्यातच पहात होते.पण हा झाला इतिहास.आज दोघांमध्ये घनिष्ठ याराना आहे.हा याराना गरजेतून निर्माण झालेला आहे हे विसरता येणार नाही.या दोस्तीला नैतिकतेचा मुलामा देताना ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू असत नाही ‘असं दोन्ही बाजुनं न विसरता सांगितलं जातंय.हे सत्य वचन असलं तरी ते पूर्ण कथन नाही . ‘कोणीच कोणाचा कायमचा शत्रू जसा असत नाही तसाच तो कायमचा मित्रही असत नाही’ हे जयंत पाटील अथवा सुनील तटकरे सांगत नाहीत.परस्परांच्या हितसंबंधांना छेद देणार्या घटना,निर्णय झाले की,’दोस्त दोस्त ना रहा’ म्हणण्याची वेळ येते.दोस्त दोस्त ना रहाचे सूर कधी ऐकायला येतील याची वाट पहात रायगडची जनता शांतपणे घडणार्या घडामोडींवर नजर ठेऊन आहे.
असं गृहित धरा की,या याराना संपण्यासाठी रायगडमध्ये काही घडणारही नाही.पण राजकारण हे पार्यासारखं असतं आणि राजकारणात अकल्पीत अशा अनेक घटना घडत असतात.बर्याचदा त्यावर विश्वास ठेवणंही अशक्य होऊन जातं.उत्तर प्रदेशात अखिलेष आणि मायावती एकत्र येऊ शकत असतील तर या देशातील राजकारणात काहीही घडू शकतं असं म्हणायला वाव आहे.उत्तर प्रदेशातच कश्याला कालपर्यंत सुनील ‘तटकरेंना अलिबागेत पाय ठेऊ देणार नाही’च्या गर्जना करणारे मधु ठाकूर आणि सुनील तटकरे परस्परांच्या गळ्यात गळे घालू शकत असतील तर भाजप आणि राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येणारच नाहीत असा दावा कोणी करू शकत नाही.नाही तरी राष्ट्रवादी गेली पाच वर्षे भाजपच्या गळ्यात गळे घालायला उताविळ झालेली आहेच.विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच राष्ट्रवादीला भाजप प्रेमाचे भरते आले होते आणि त्यांनी एकतर्फी पाठिंबाही जाहीर केला होता.एवढेच कश्याला आज महाराष्ट्रात राष्ट्रवादीची कॉग्रेसबरोबर आघाडी आहे,मात्र तिकडे गुजरातमध्ये कॉग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी राष्ट्रवादीेने 26 मतदार संघात उमेदवार उभे केले आहेत.गुजरात विधानसभेच्या वेळेस राष्ट्रवादीने कॉग्रेसचे किमान सात उमेदवार पाडले होते.हे सारं भाजपला खूष करण्यासाठीच असल्याचं राजकीय निरिक्षकांना वाटतं.याचं कारण असं की,भाजपला दोनशे ते सव्वा दोनशेच्यावर जागा मिळत नाहीत असे अंदाज आहेत.सरकारसाठी भाजपला छोटया छोटया प्रादेशिक पक्षाची गरज भासणार आहे.अशा स्थितीत राष्ट्रवादी युपीए सोडून कधी एनडीएत जाऊन बसेल याचा थांगपत्ताही कोणाला लागणार नाही.आज भाजप-शिवसेना परस्परांच्या प्रेमात आहेत त्यामुळं राष्ट्रवादी जर एनडीएत येणार असेल तर सेनाही विरोध करणार नाही.तेव्हा शेकापची होणारी फरफट केविलवाणी असेल .राष्ट्रवादी जर भाजपच्या कळपात गेली तर अगदी जिल्हयातही राष्ट्रवादीला शेकापची गरज लागणार नाही.मग सुनील तटकरे अलिबाग ऐवजी पनवेलकडे फेर्या वाढवतील.म्हणजे शेकाप एकटा पडलेला असेल.अनेकांना हे समीकरण कल्पनाविलास वाटू शकते पण राजकीय पक्ष्याचे स्वभाव बघता हे अशक्य नाही.याचा विचार शेकापनं केलेला असण्याची शक्यता नाही.शरद पवार हे नरेंद्र मोंदींचे गुरू आहेत.मोदींनीच हे जाहीर केलेले आहे.त्यामुळं गुरूची मदत घ्यायला शिष्याला कोणताच संकोच वाटणार नाही.त्यामुळं हे अशक्य नाहीच.किंबहुना तसेच घडणार आहे . अशा स्थितीत शेकापचं काय ? हा प्रश्न उरतो.शेकापलाही कोणाचे वावडे नाही हे जरी खरे असले तरी राजकीय बार्गिनिंग करायला शेकापकडं काहीच असणार नाही.एकही खासदार असणार नाही .. म्हणजे शेकापची गरज कोणालाच नसेल .रामशेठ ठाकूर खासदार असताना आमच्या एका मतानं अटलजींचे सरकार पाडल्याचा डांगोरा जयंत पाटील अनेक वर्षे पिटत होते.तेव्हा रामशेठ तरी होते.आज रायगडही नाही,आणि मावळही नाही.त्यामुळं कोणतीच बार्गेनिंग पॉवर नाही. राजकारणात उपद्रवमूल्य नसेल तर कोणीच तुम्हाला विचारत नाही.राज ठाकरेंची आज झालेली स्थिती हे त्याचं ताजं उदाहरण आहे.23 तारखेनंतर तशीच वेळ शेकापवर येऊ नये अशीच शेकापचा एक हितचिंतक म्हणून माझी अपेक्षा आहे.राजकारण बदलतंय असं दिसलं तर याराना इतिहास जमा होईल आणि सुनील तटकरेंना दोस्ताचा फोन घ्यायलाही फुरसत असणार नाही..हे नक्की.
एस.एम.देशमुख
.