क़ृपया प्रसिद्धीसाठी दिनांक : 13-7-2019
राधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पत्रकार श्री राधाकृष्ण नार्वेकर यांना दिला जाणार असल्याची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आज केली. आचार्य अत्रे जयंतीच्या दिवशी, दि. 13 ऑगस्ट रोजी, समारंभपूर्वक श्री. नार्वेकर यांना हा पुरस्कार देण्यात येईल, असे श्री. वाबळे म्हणाले.
मराठी पत्रकारितेत सुमारे पाच तप कार्यरत राहिलेल्या श्री नार्वेकर यांनी दैनिक `नवाकाळ'चे बातमीदार ते संपादक, दैनिक `सकाळ', दैनिक `पुण्यनगरी' वृत्तपत्र समूहाचे सल्लागार संपादक ही सर्व महत्त्वाची जबाबदारीची पदे भुषविली आहेत. मुंबईतील दैनिक `सकाळ'च्या संपादक पदावरुन निवृत्त झाल्यावर नार्वेकर यांनी लिहिलेले `सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय?’ हे पुस्तक लोकप्रिय ठरले. उर्दू भाषेत त्याचे भाषांतर झाले आहे. हिंदी व इंग्रजी भाषेतही भाषांतर झाले आहे. लवकरच त्याचे प्रकाशन होईल. त्यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मुंबईतील अनेक नामवंत पत्रकार आणि संपादक घडविण्यासाठी नार्वेकर यांनी दिलेले योगदान अमुल्य आहे. माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळावे, गिरणी कामगारांना न्याय मिळावा नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे रक्षण व्हावे, वसई–विरार, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, शहापूर या शहरांच्या विकासाकरिता मुंबई सकाळच्या माध्यमातून विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. या उपक्रमांची शासनाने देखील दखल घेतली आहे. या पुरवण्या निश्चितच मार्गदर्शक व संग्राह्य ठरल्या आहेत. यासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल शासनपातळीवर सुध्दा घेतली गेली आहे. दूरदर्शनचा सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. अनेक महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले नार्वेकर संपादक या नात्याने अमेरिका, जपान, रशिया, इस्राएल, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा विविध देशात महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. लोणावळा येथील दि. गो. तेंडुलकर स्मृती मंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना, त्यांच्याच पुढाकाराने निसर्गरम्य परिसरातील पत्रकार संघाची ही वास्तू उभी राहिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून काम केलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार देताना पत्रकार संघांला आनंद होत आहे. आचार्य अत्रे यांच्या प्रमाणेच शिक्षकी पेशामधून पत्रकारितेचा मार्ग स्वीकारून समाज हितासाठी झटणारे आणि अनेकांना तसं झटण्याची प्रेरणा देणारे नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास अनुमती दिल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला आहे, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी म्हटले आहे.