मुलाखती देताना अनेक पत्रकारांची भंबेरी उडविणारे राज ठाकरे आपणास काही काळासाठी पत्रकाराच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत.इतरांना मुलाखती देणारे राज ठाकरे आता स्वतः राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेत आहेत.ही मुलाखत पुण्यात बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर नव्या वर्षात 3 जानेवारी रंगणार आहे.असं सांगितलं जातंय की,राज ठाकरे उत्स्फुर्तपणे शरद पवारांना प्रश्न विचारतील.प्रश्न मॅचफिक्सिंग असणार नाहीत.ठाकरी भाषेत विचारले जाणारे प्रश्न आणि तेवढयाच संयमानं पण सावधपणे दिली जाणारी उत्तरं ऐकणं ही एक पर्वणी ठरणार आहे.
शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवीनिमित्त त्यांच्या अनेक ठिकाणी अनेक मुलाखती झाल्या.मात्र एखादी संस्मरणीय मुलाखत व्हावी असे पवार समर्थकांना वाटत होते.ऐतिहासिक ठरेल अशी मुलाखत कोण घेऊ शकेल ? याचा शोध गेली दोन महिने सुरू होता.अनेक नावांवर चर्चा झाली.अखेर राज ठाकरे यांचे नाव नक्की झालं.राज ठाकरेंनी देखील त्यास संमंती दिली असून येत्या 3 जानेवारीला ही ऐतिहासिक मुलाखत रंगणार आहे.शरद पवारांचे राजकारण,समाजकारण यासह पवारांसी निगडीत अनेक विषयांवर राज ठाकरे थेट प्रश्न विचारतील अशी अपेक्षा आहे.पवारांचा राजकारण प्रवेश,त्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची लोकभावना,कॉग्रेस मधून बाहेर पडणे,सोनिया गांधींना केलेला विरोध,हुकलेले पंतप्रधानपद,कृषी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय ,मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी ,चित्रपट,साहित्य,पत्रकारितेतील मंडळींशी असलेली जवळीक,बारामती कशी घडविली येथपासून ते नरेंद्र मोदी यांच्याशी असलेला दोस्ताना,काका-पुतण्याचे संबंध,सुप्रिया सुळेंची राजकीय वाटचाल,राष्ट्रवादीेचे भवितव्य इथंपर्यंत अनेक विषयांवर राज ठाकरे पवारांना बोलते करतील अशी अपेक्षा आहे.अशी मुलाखत महाराष्ट्रानं यापुर्वी पाहिली नसेल असं आयोजकांचं मत आहे.