मुंबई आणि पुण्यातील वृत्तपत्रे आणि टीव्हीमध्ये मराठवाडयातील तरूण पत्रकार तर आपली चमक दाखवत आहेतच त्याचबरोबर पत्रकारांच्या संघटनांचं नेतृत्वही आता बीड आणि पर्यायानं मराठवाडयाकडं आलं आहे.राज्य पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांच्या ज्या प्रमुख संघटना आहेत त्यापैकी बहुतेक संघटनांचं नेतृत्व आता बीड जिल्ह्यातील पत्रकार करीत आहेत.मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख असलेले एस.एम.देशमुख आपल्या वडवणी तालुक्यातील देवडीचे आहेत. परिषद अध्यक्ष आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक म्हणून पत्रकारांना संघटीत कऱण्याचं मोठं काम त्यांनी राज्यभर केलं आहे. 23 वर्षे विविध मान्यवर दैनिकात संपादकपद भूषविलेल्या एस.एम.देशमुख यांनी परिषद गाव आणि तालुका पातळीपर्यंत पोहोचविली आहे.गेल्या एका वर्षात पत्रकारांचे 16 प्रश्न त्यांनी मार्गी लावले असून 17 पत्रकारांना विविध स्वरूपाची मदत केलेली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून गजेंद्र बडे यांची काही दिवसांपुर्वीच निवड झालेली आहे.ते वडवणी तालुक्यातील चिंचाळा गावचे रहिवासी आहेत.एका छोटया गावातून येऊन पुणे श्रमिक संघासारख्या प्रतिष्ठित आणि 78 वर्षाच्या जुन्या संघटनेचे अध्यक्षपदापर्यंतची झेप त्यानी घेतलेली आहेत.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ ही मुंबईत दबदबा असलेली महत्वाची पत्रकार संघटना आहे.या संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप सपाटे यांची प्रचंड मताधिक्यानं निवड झाली आहे.ही गोष्ट बीड जिल्हयातील पत्रकारांसाठी नक्कीच अभिमानाची आहे.बीड जिल्हयाच्या केज तालुक्यातील एका खेडयातून आलेल्या सपाटे यांनी मुंबईत स्वतंःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.एक अजादशत्रू पत्रकार म्हणून मंत्रालयात ओळख असणारे सपाटे नक्कीच मंत्रालया आणि विधिमंडळ संघाचे अध्यक्ष म्हणून आपल्या कार्याची छाप उमटवतील यात शंकाच नाही.
या तीनही पत्रकारांचा बीड जिल्हयाला सार्थ अभिमान आहे.पत्रकारितेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि बीड जिल्हयातील छोटया खेडयातून जाऊन त्यांनी पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रात आपले स्थान निर्माण केले आहे.त्याचा आनंद बीड जिल्हयाला आणि मराठवाडयातील तमाम पत्रकारांना आहे.बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकांनंतर या तीनही मान्यवर पत्रकारांचा आणि भूमीपूत्रांचा बीडमध्ये भव्य सत्कार करण्याची आमची कल्पना आहे.त्यादृष्टीने सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
– अनिल महाजन,
औरंगाबाद विभागीय सचिव,मराठी पत्रकार परिषद