सोयगावः कोकणातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी तब्बल पाच वर्षे अथक लढा दिला.अखेर पत्रकारांच्या या लढयाला यश आलं.आता रस्त्याचं काम वेगानं सुरू आहे.कोकणातील पत्रकारांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवत करमाळ्याच्या पत्रकारांनी यापुर्वी रस्त्यासाठी आंदोलन केलं.आता सोयगावच्या पत्रकारांनी रस्त्यासाठी आंदोलनाचं रणशिंग फुंकलं आहे.सोयगाव ते चाळीसगाव या रस्त्याची चाळण झाली आहे.रस्त्याकडं कोणाचंच लक्ष नाही,लोकप्रतिनिधी उदासिन आहेत हे स्पष्ट झाल्यावर आता सोयगाव तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.येत्या 26 जानेवारी रोजी हे आंदोलन होणार आहे.हे लाक्षणिक आंदोलन नसून पत्रकार बेमुदत उपोषण करणार आहेत.मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पत्रकारांनी यासंबंधीचे निवेदन काल दिले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले,सोयगावच्या रस्त्यासाठी बांधकाम मंत्री निधी देत नाहीत.याउलट भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या मतदार संघातील रस्त्यांसाठी बारा कोटींचा निधी दिला गेला आहे.मी भाजपमध्ये प्रवेश करीत नसल्यानं माझी अडवणूक सुरू असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.आता पत्रकारच रस्त्यावर उतरत असल्याने बांधकाम खाते या आंदोलनाची दखल घेते की नाही ते पहावे लागेल.लोकहितासाठी सोयगावचे पत्रकार आंदोलन करीत असल्याने मराठी पत्रकार परिषदेचा संपूर्ण पाठिंबा या पत्रकारांना असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.–