रविवारी राज्यभर पत्रकारांचे मुक मोर्चे

0
1051

पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी रविवारी राज्यभर पत्रकारांचे मुक मोर्चे

मुंबई दिनांक 30 ( प्रतिनिधी ) राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले,पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून हितसंबंधियांकडून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा सातत्यानं होत असलेला प्रयत्न आणि ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्यास सरकार करीत असलेली टाळाटाऴ याचा निषेध करण्यासाठी राज्यातील पत्रकार येत्या 2 ऑक्टोबर 2016 रोजी राज्यभर मुक मोर्चे काढ त आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनास राज्यातील पत्रकारांच्या बहुसंख्य संघटनांनी पाठिंबा दिलेला असल्याने राज्यातील पंचवीस हजारावर पत्रकार रविवारी रस्त्यावर उतरतील असा अंदाज आहे.आंदोलन शांततेत आणि नेहमीच्या शिस्तीत होणार आहे.राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. पत्रकार संरक्षण कायदा करावा यामागणीसाठी राज्यातील पत्रकार गेली दहा वर्षे शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत.सरकार आले गेले,मात्र अजून कायदा झालेला नाही.पत्रकारांना कोरडया आश्‍वासनाशिवाय काहीच मिळत नसल्याने पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.राज्यात दर चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे.2016 च्या पहिल्या आठ महिन्यात राज्यात 63 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्याच्या 32 घटना घडल्या असून पत्रकाराांवर बलात्कार,विनयभंग,अ‍ॅट्रॉसिटी,खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची मुस्कटदाबी कऱण्याचे 33 प्रकार समोर आलेल्या आहेत.एकीकडे हल्ले वाढले आहेत आणि दुसरीकडे जाहिरनाम्यात आश्‍वासन देऊनही सरकार पत्रकार पेन्शन आणि पत्रकारांच्या अन्य मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.मजिठियाची अंमलबजावणी करावी आणि वृत्तपत्रांना देण्यात येणार्‍या जाहिरात दरात सरसकट शंभर टक्के वाढ करून थकित बिले त्वरीत दिली जावी अशीही पत्रकारांची मागणी आहे. पत्रकारांच्या कोणत्याच मागण्या सोडविल्या जात नसल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.2 ऑक्टोबर रोजी मुक मोर्चाच्या माध्यमातून पत्रकार ती व्यक्त करीत आहेत. राज्यातील सर्वच जिल्हयात हे मोर्चे निधतील.जिल्हयाच्या ठिकाणी मुख्य मार्गावरून हे मुकमोर्चे गांधी पुतळ्याजवळ जातील.तेथे गांधीजींना अभिवादन करून मुक मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होईल.मुंबईत मात्र मोर्चा निघणार नाही.मंत्रालयानजिकच्या गांधी पुतळ्याजवळ पत्रकार काळ्या फिती लावून जमा होतील.गांधीजींच्या पुतळ्याला अभिवानद करतील.त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वच जिल्हयात मोर्चाची तयारी जोरात सुरू असून अनेक सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांनी पत्रकारांच्या या आंदोलनास पाठिंबा जाहीर केल्याने पत्रकारांचे हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार असल्याचा दावा एस.एम.देशमुख यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here