त्नागिरी, १४ एप्रिल,शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य आवश्यक आहे. पत्रकारांनी शासकीय योजनांची माहिती जाणून घेऊन त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन रत्नागिरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर.एस.शिंदे यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशेपंचविसाव्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि सामाजिक न्याय विभागातर्फे काल रत्नागिरीच्या सामाजिक न्याय भवनात पत्रकारांसाठी कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य प्रमोद जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक पनवेलकर, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य इक्बाल शेख, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अर्जुन बन्ने, जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय कोळी, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष हेमंत वणजू यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्री.शिंदे यांनी कार्यशाळा आयोजनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. पत्रकारांनी शासकीय योजनांच्या माहितीचे विश्लेषण करून त्यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि योजना यशस्वी करण्यात योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या विभागाकडील योजनांची माहिती दिली.
दरम्यान, आंबेडकर जयंतीचेच निमित्त साधून सामाजिक न्याय विभागातर्फे प्रबोधनपर व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. प्रमोद जाधव, अर्जुन बन्ने, विजय कोळी, प्रमुख वक्ते रोहित देव, प्रा.संयोगिता सासणे,सदाशिव सावंत उपस्थित होते.श्री.देव यांनी भारतीय राज्यघटना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्रीमती प्रा. सासणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जाती व्यवस्थेविरोधात लढा या विषयावर आपले विचार व्यक्त केले. श्री.जाधव यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर श्री. सावंत आणि सहकारी कलावंतांनी प्रबोधनपर जलसा कार्यक्रम सादर केला.
हिंदुस्थान समाचार