भांडवलदारी पत्राचं सोडा,पण ज्या दैनिकांना जनाधाराशिवाय कुणाचा आधार नाही अशा पत्रांनी पन्नाशीचा टप्पा गाठणं ही गोष्ट खरोखरच अप्रूप करावी अशीच आहे.महाराष्ट्रात प्रजावाणी,ऐक्य,संचार,कृषीवल,ठाणे वैभव,सन्मित्र ,हिंदुस्थान,आपला महाराष्ट्र,गावकरी,नवाकाळ,सागर ,नवा मराठा,ललकार, ही अशी काही दैनिकं आहेत की,भांडवलदारी वृत्तपत्रांचं आक्रमण आणि असंख्य अडचणींना तोड देत त्यानी आपलं सत्व ठिकवून वाटचाल सुरू ठेवली आहे.रत्नभूमी हे असंच एक दैनिक.कोकणात एक तर वाचक मिळविणं महाकठिण काम.त्यात जाहिरातीच्या नावानंही आनंदी आनंद .असं असतानाही केवळ जनतेचं पाठबळ आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर पालांडे कुटुंबानं हे पत्र चालविलं आणि त्याला जनमानसात स्थानही मिळवून दिलं.कोकणचा आज बराच विकास होत आहे.नवे प्रकल्प आले आहेत.उद्योग आले आहेत.त्यामुळं जाहिरातीचे स्त्रोतही वाढले आहेत.मात्र 1967 मध्ये जेव्हा भिकाजी रामचंद्र पालांडे यांनी हे दैनिक सुरू केलं तेव्हाची कोकणातील परिस्थिती नक्कीच दैनिक काढण्यासारखी नव्हती.परंतू कोकणाला पत्रकारितेचा मोठा वारसा असल्यानं पालांडे यांनी हे धाडस केलं आणि नंतरच्या पिढीनंही त्याच हिंमतीनं दैनिक सुरू ठेवलं.रत्नभूमी,सागर,कृषीवल,कुलाबा समाचार या पत्रांनी त्याकाळी कोकणातील वाचकांना वैचारिक खुराक तर दिलाच त्याचबरोबर कोकणातील तत्कालिन विविध चळवळीतही ही पत्रे अग्रस्थानी होती.कृषीवल,कुलाबा समाचार सारख्या पत्रांनी अनेक चळवळींचं नेतृत्वही केलं.या पत्रांचा खप आणि कार्यक्षेत्र भलेही मर्यादित असेल पण त्यांची हिंमत मोठी होती त्यामुळंच व्यवस्थेच्या विरोधात लढताना या पत्रांनी कधी हातचं राखून लेखन केलं नाही किंवा कुणाची भितीही बाळगली नाही.रत्नभूमीनं तळ कोकणातील जनविरोधी प्रवृत्तीनं नागडं केलं,राजकारण्यांच्या मनात धास्ती निर्माण केली आणि सर्वसामांवन्यांचा प्रतिनिधी बनून रत्नागिरी जिल्हयातील अनेक प्रश्नांना वेशिवर टांगलं.जिल्हा पत्रांना अनेक दडपणं असतात ,प्रलोभनंही असतात मात्र रत्नभूमी न कधी कोणतं दडपण मानलं ना कोणी रत्नभूमीला विकत घेऊ शकलं.त्यामुळंच चंद्रकला लोटलीकर खून खटला असो की सामांन्यांवरील अन्यायाचे अन्य विषय असतील रत्नभूमीनं त्यांचा छडा लावला आणि संबंधितांनाही न्यायही मिळवून दिला.भिकाजी पालांडे यांनी दिलेल्या याच पायवाटेवरून नंतरच्या काळात धनजंय पालांडे चालत राहिले.मात्र त्यांच्या अकाली निधनानं रत्नभूमी खर्या अर्थानं पोरके झाले.मात्र धनश्री पालांडे यांनी नंतर रत्नभूमीची धुरा सांभाळली.आज अनेक संकटावर मात करीत,अनेक छुप्या शत्रूंशी चार हात करीत रत्नभूमीचं प्रकाशन त्यांनी सुरू ठेवलं आहे.आपला वाचकही जपला आहे.रत्नागिरीत आज चोहोबाजुंनी मोठी वर्तमानपत्रे येत असतात.या गर्दीतही रत्नभूमी आपलं वेगळेपण आणि तेज जपून आहे ही गोष्ट नक्कीच अभिनंदनीय आहे.पत्रापुढं आर्थिक अडचणी जरूर आहेत परंतू पत्रकारिता हे व्रत समजूनच हे पत्र आजही चालविलं जात आहे.येत्या 26 तारखेला रत्नभूमीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.रत्नभूमीची पन्नास वर्षांची ही वाटचाल नक्कीच प्ररणादायी अशीच आहे.आणखी एक उल्लेख आवश्यक आहे.धनश्री पालांडे यांनी आज मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कोकणात नवे पत्रकार घडविण्याचा अभ्यासक्रम सुरू केला असला तरी रत्नभूमी हे खर्या अर्थानं कोकणातल्या असंख्य पत्रकारांसाठी पत्रकारितेचं विद्यापीठ राहिलेलं आहे.नंतरच्या काळात ज्यांनी पत्रकारितेत उल्लेखनिय कार्य केले अशी अनेक पत्रकारांनी रत्नभूमीत उमेदवारी केलेली आहे.जनसेवेची पन्नाशी गाठणारं हे दैनिक आणि त्याचं व्यवस्थापन आज नक्कीच समाधानी आहे.त्यांचे प्रश्न आहेत पण व्यवस्थेबद्दल कुरबूर नाही.टाइम्स सारखे महाबलाढ्य पत्रं विविध समस्यांचा पाढा वाचत नक्राश्रू गाळत असताना रत्नभूमी मात्र भिकाजी पालांडे यांनी दाखवून दिलेल्या मार्गानं न रडता,न कुथता वाटचाल करीत आहे ही गोष्ट विशेष महत्वाची आहे.रत्नभूमीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त रत्नभूमीस ,परिषदेच्या कोकण विभागीय सचिव आणि रत्नभूमीच्या संपादिका धनश्री पालांडे यांना मनःपूर्वक शुभेच्छा.रत्नभूमी शतकी वाटचाल करणारं दैनिक ठरावं एवढीच अपेक्षा ( एस एम )