‘रझाका’रच्या निमित्तानं …
.हैदराबाद मुक्ती लढा हा त्याग,निर्धार,देशप्रेम,सातत्य आणि लोकलढ्याचं मुर्तीमंंत प्रतिक असताना भारताच्या इतिहासानं या दैदीप्यमान लढ्याची पाहिजे तेवढी आणि पाहिजे तशी दखल घेतली नाही.हा लढा खऱ्या अर्थानं लोकांसमोरही आलाच नाही.हैदराबाद मुक्ती लढ्याची माहिती देणारी काही पुस्तकं आली पण ती लोकांप्रर्यत फारशी पोहोचली असं झालं नाही. सरकारनंही त्यासाठी जाणीवपूर्वक पयत्न केले नाही.अशा स्थितीत हैदराबाद मुक्ती लढयावर एखादा चित्रपट आला तर हा इतिहास आजच्या तरूण पिढीला माहिती होईल आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल तेरा महिन्यांनी मराठवाडा स्वतंत्र झाला हे वास्तवही त्यांना समजून येईल असे सारखे वाटायचे.या पार्श्वभूमीवर रझाकार नावाचा चित्रपट येतोय ही बातमी मराठवाड्यातील जनतेसाठी आणि या लढ्याची उत्सुकता असलेल्यांसाठी नक्कीच आनंंदाची आहे.
रझाकार या चित्रपटाच्या नावावरून ही कथा रझाकारांच्या अत्याचाराशी निगडीत आहे हे स्पष्ट होते.हैदराबादच्या निजामाने आपले अस्तित्व टिकविण्यासाठी ज्या जुलमी संघटनेची मदत घेतली होती तिचं नाव रझाकार होतं.रझाकार या शब्दातच संघटनेचं क ्रौर्य ध्वनित होतं.आजच्या अतिरेकी टोळ्यानाही लाजविल एवढे अमानुष अत्याचार कासिम रझवी आणि त्याच्या रझाकार या अतिरेकी संघटनेने केले होते.रझाकार या उच्चरानेही तेव्हा लोकांचा थरकाप उडायचा.एक रझाकार जरी गावात आला तरी गावात संचारबंदी लागल्यासारखी स्थिती व्हायची.आया बहिणींना बाहेर पडायचीही भिती असायची.अशा या टोळीच्या विरोधात मराठाडयातील जिगरबाज जनतेने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निकराचा लढा दिला. अंतिमतः तो यशस्वी झाला.निजामाला पाकिस्तानमध्ये सामिल व्हायचे होते.मात्र त्यासाठी संस्थानातील जनतेची तयारी नव्हती.कल्पना करा पाकिस्तानात सामिल होण्याचे निजामाचे स्वप्न साकार झाले असते तर किती भीषण समस्येला आपणास तोंड द्यावे लागले असते.हैदराबादच्या प्रश्नावर नेहरूंची काय भूमिका होती,सरदार पटेलांची काय भूमिका होती या वादात जाण्याचे कारण नाही पण गृहमंत्री असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानात लष्कर घुसविले आणि चार दिवसात हैदराबादचा निजाम शरण आला.तो दिवस होता 17 सप्टेंंंंंंंंबरचा. मराठवाड्याचा हाच स्वातंत्र्य दिन.ही लष्करी कारवाई पोलीस ऍक्शन म्हणून ओळखली जाते.नेहरू श्रेष्ठ की,पटेल ? राजकाऱणासाठी ज्यांना हा वाद घालायचाय त्यांनी जरूर घालावा पण मराठवाड्यातील जनतेला मात्र स्वांतंत्र्य मिळवून देणाऱ्या सरदारांबद्दल विेशेष ममत्व आहे हे नक्की.हैदराबाद मुक्ती लढा हा एका बलदंड आणि अत्याचारी व्यवस्थेविरूध्द सामांन्यजनांनी दिलेला लढा होता.तो जसा रोमहर्षक होता तसाच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक सोनेरी पान म्हणून शोभून दिसावा असा होता.मात्र कॉग्रेस पुढाऱ्यांंंंच्या आत्मकेंद्री राजकारणामुळे स्वामींजींसह या लढ्यातील वीरांची जशी उपेक्षा झाली तशीच या लढ्याचीही भारताच्या इतिहासानं पाहिजे तेवढी दखल घेतली नाही याची बोच माझ्यासह प्रत्येक मराठवाडी माणसाच्या मनात आहे.आता चित्रपट येतोय त्यामुळे हा इतिहास पुन्हा जागा होईल अशी अपेक्षा आहे.चित्रपटाची मांडणी कशी आहे माहिती नाही पण हा चित्रपट या लढ्यास,या लढ्यातील वीरांना न्याय देणारा,त्यांचंा गौरव कऱणारा असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.(SM)