फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची ओळख आहे.. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात अंदमान कुख्यात होते ते काळे पाणी आणि तेथील सेल्युलर जेलसाठी… अंदमानची ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न कधी झाला नाही.. त्यामुळं देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी अंदमानवरील इंग्रजी राजवटीच्या छटा जागोजागी दिसतात.. अंदमान व्दिपसमुहात 556 छोटी मोठी बेटं आहेत.. या सर्व बेटांना आजही इंग्रजी नावं आहेत.. .. रॉस, वाईपर, चाथम, हॉम्पिगंज, हॅवलॉक, नील, स्मिथ, जॉलीबॉय अशी ही नावं…. या सर्व बेटांवरून फिरताना अंदमानवरील इंग्रजी राजवटीच्या खुणा पुसून का टाकल्या जात नाहीत? असा प्रश्न वारंवार पडायचा.. हे करायचं तर पोर्टब्लेअर पासून सर्वच बेटांची नावं बदलली पाहिजेत असं वाटायचं.. नावं बदलताना ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली अशा महान स्वातंत्र्य सैनिकांची नावं या बेटांना दिली जावीत असं वाटायचं.. तसा एक सविस्तर लेख परत आल्यानंतर मी लिहिला होता.. कालांतरानं रॉस बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव दिलं गेलं.. नील बेट शहीद द्विप बेट झाल .. हॅवलॉक बेटाचं स्वराज द्वीप असं नामकरण केलं गेलं.. नक्कीच आनंद वाटला..
आज सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे.. सुभाष बाबू आणि अंदमानचं वेगळं नातं आहे.. त्यांच्या जयंतीचं निमित्त साधून द्विपकल्पातील २१ बेटांना सैन्यातील शौर्यपदक मिळविणारया भारत मातेच्या सुपूत्रांची नावं देण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे… इतर बेटांबाबत देखील असाच निर्णय घेतला गेला पाहिजे.. कारण देशाला गुलाम करून दीर्घकाळ अत्याचार करणारया जुलमी राजवटीतील अधिकारयांची बेटांना असलेली नावं बदलली गेलीच पाहिजेत…