प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया प़माणेच पोर्टल आणि युट्यूब चॅनल्सला देखील सरकारी जाहिराती मिळाव्यात : एस.एम.देशमुख यांची मागणी

केज : प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रमाणेच सोशल मिडियासाठी नियमावली तयार करून सरकारने पोर्टल आणि यू ट्यूब चॅनल्ससाठी सरकारी जाहिराती सुरू कराव्यात अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त, ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
केज येथील आदर्श पत्रकार संघाच्यावतीने एस.एम.देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.. सत्काराला उत्तर देताना देशमुख बोलत होते..
आपल्या भाषणात एस. एम. म्हणाले, अगोदर प्रिन्टला सरकारी जाहिराती मिळत, नंतर इलेक्टॉनिक मिडिया आल्यानंतर या माध्यमांना ही सरकारी जाहिराती मिळू लागल्या.. आता सोशल मिडिया प्रभावी झाल्याने आणि काळाची गरज लक्षात घेऊन या माध्यमांना देखील सरकारी जाहिराती मिळाल्या पाहिजेत.. त्यासाठी आवश्यक ती नियमावली सरकारने करावी अशी सूचना देशमुख यांनी केली.. पोर्टल आणि यू ट्यूब चॅनल्स देशात अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहेत, पुढील काळ हा सोशल मिडियाचा असल्याने या माध्यमांकडे सरकारला दूर्लक्ष करता येणार नाही असे मत देशमुख यांनी व्यक्त केले..
पत्रकार संरक्षण कायदा झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत देशमुख म्हणाले, कायदा झाल्यामुळे हललयाचं प्रमाण जरी कमी असले तरी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो आहे.. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यापुर्वी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची संमती घेतली जावी अशी सूचना त्यांनी केली.. प़ेस कौन्सिलच्या चेअरमन यांनी देखील अशी मागणी केलेली आहे..
यावेळी बोलताना समीरण वाळवेकर यांनी पत्रकारांनी आर्थिकदृषटया सक्षम होण्यासाठी पूरक व्यवसाय सुरू करावेत अशी सूचना केली..
यावेळी विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, रमेशराव आडसकर आदिंची भाषणे झाली.. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारया मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला.. या कार्यक्रमास केजकरांनी मोठी गर्दी केली होती..प़ारंभी आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय अरकडे यांनी सर्वांचे स्वागत केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here