बी. एस. येडियुरप्पा सह एकूण ५२ जणांची दुसरी यादी आज भाजपने जाहीर केली.
यात कर्नाटकातील दक्षिण बेंगळुरूमधून सरचिटणीस अनंत कुमार यांना तर शिमोगा मतदारसंघातून येडुयुरप्पा यांना तिकीट देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी मतदारसंघातून पत्रकार चंदन मित्र यांना तर आसनसोल मतदासंघातून गायक बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आज जाहीर केलेल्या ५२ जणांच्या यादीत आसाममधील ५, कर्नाटकातील २०, केरळमधील ३, ओडिशामधील ५, त्रिपुरातील २, पश्चिम बंगालमधील १७ जागांवरील उमेदवारी जाहीर करण्यात आली.
भाजपने यापूर्वी गेल्या आठवड्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. १३ मार्चला पक्षाची बैठक होणार असून, तेव्हा पुढील यादी जाहीर होईल, असे सांगण्यात येते. यात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदींच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.